नामदेव मोरे, नवी मुंबई : सुनियोजीत शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईला अतिक्रमणांचा विळखा पडू लागला आहे. मागील पाच वर्षात तब्बल ३१०० इमारतींचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांची संख्या १५ हजार पर्यंत पोहचली आहेत. अतिक्रमणमुक्त नवी मुंबई करण्याचे आव्हान सिडको, महानगरपालिका व एमआयडीसीसमोर उभे राहिले आहे.
देशातील सुनियोजीत शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश केला जात होता. परंतु महानगरपालिका, सिडको व एमआयडीसीने अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यामुळे संपूर्ण शहराला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. झोपडपट्टी परिसर वगळून उर्वरीत शहरामध्ये मागील पाच वर्षामध्ये तब्बल ३१०० नवीन अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या बांधकामांना महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने नोटीसही दिल्या आहेत. यापैकी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. २०२३ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात ५३४ नवीन बांधकामे सुरू झाली आहेत.
महानगरपालिका व सिडको प्रशासन अनधिकृत इमारतींवर कारवाई करते. परंतु बांधकामांची संख्या व कारवाईचे प्रमाण यामध्ये खूपच तफावत आहे. यामुळे कोपरखैरणे, वाशी, घणसोली, ऐरोली, तुर्भे, नेरूळ, सानपाडा येथील बैठ्या चाळींच्या जागेवर अनधिकृतपणे ४ ते ५ मजल्यांच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. याशिवाय गावठाण व विस्तारीत गावठाण परिसरामध्येही शेकडो बांधकामे करण्यात आली आहेत. २०१८ पुर्वी जवळपास १२ हजार अनधिकृत बांधकामे होती. त्यामध्ये आता ३ हजार नवीन बांधकामांची भर पडली असून एकूण अनधिकृत इमारतींची संख्या १५ हजार पेक्षा जास्त झाली आहे. या अतिक्रमणांमुळे शहरातील पाणी पुरवठा, मलनिस:रण वाहिन्या व इतर सुविधांवर ताण पडू लागला आहे. सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे व इतर अनेकांनी अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी महानगरपालिकेसह एमआयडीसीकडेही पाठपुरावा सुरू केला आहे.
वर्षनिहाय अतिक्रमणांची यादीवर्ष - अनधिकृत बांधकामे
२०१८ - ५०९२०१९ - ६६३२०२० - २११२०२१ - ६२७२०२२ - ५४९
जानेवारीपासून शहरातील अतिक्रमणांची संख्या
महिना - अतिक्रमणजानेवारी - ८४फेब्रुवारी - ४९मार्च ४१एप्रील ४४मे ७०जून ४१जुलै २३ऑगस्ट २७सप्टेंबर ४१ऑक्टोबर ११४