सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता लागल्याने पोलिसांवर गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याचा मोठा ताण आहे. अशातच हुक्का, पब, बार यांना पहाटे पर्यंत छुपी मुभा मिळत आहे. यामुळे गुन्हेगारी कृत्यांना थारा मिळत असून उमेदवारांच्या बेहिशोबी पार्ट्या देखील अशा ठिकाणी रंगण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतले अवैध धंदे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळातही बंद होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पहाटे पर्यंत हुक्का पार्लर, पब चालत असून संबंधित प्रशासनांकडून त्यावर कारवाईत हात आखडता घेतला जात आहे. परिणामी स्थानिक पोलिसांकडून देखील कारवाईतल्या मर्यादेच्या आडून हात आखडते घेऊन, हात धुवून घेतले जात आहेत. वाशी, सानपाडा येथे चालणाऱ्या टेरेस क्लबचे तरुणाईत मोठे आकर्षण आहे.
पहाटेपर्यंत त्याठिकाणी पब चालत असतानाही कारवाईचे धाडस केले जात नाही. त्यासाठी अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे देखील करण्यात आली आहेत. तर ज्या व्यवसायासाठी परवाना घेतला आहे, त्या ऐवजी भलतेच उद्योग चालत असतानाही परवाना विभाग हातावर घडी घालून बसत आहे. त्यावरून सर्वच प्रशासन अशा अवैध धंद्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. अशातच सानपाडा येथील मचाओ पब पहाटेपर्यंत चालत असल्याचे पुन्हा एकदा बिल स्वरूपात समोर आले आहे. तर वाशीत टेरेसवर चालणाऱ्या हाऊस ला कोणत्या "लॉर्ड" चे पाठबळ आहे ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पहाटेपर्यंत चालणाऱ्या पब, हुक्का पार्लरमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण, काही बड्या घरचे तरुण तरुणी मध्यरात्री पर्यंत वाशी परिसरात भडकत असतात. त्यातून हाणामारीच्या देखील घटना मागील काही दिवसात घडल्या आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात देखील असे प्रकार घडत राहिल्यास निवडणुकीला गालबोट लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.