लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बंद घरांची रेकी करून घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध गुन्ह्यातील ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाशीत घडलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली असता उत्तर प्रदेश व इतर ठिकाणी सापळे रचून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
वाशी सेक्टर ६ येथे घरफोडीची घटना जानेवारीत घडली होती. त्यामध्ये सुमारे एक कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वाशी पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी निरीक्षक राजू सोनावणे, सहायक निरीक्षक प्रशांत तायडे, उपनिरीक्षक निलेश बारसे, हवालदार श्रीकांत सावंत, विनोद वारिंगे, सुनील चिकणे, चंदन म्हसकर आदींचे पथक तयार केले होते. या पथकाने सीसीटीव्ही व इतर तपासात संशयित गुन्हेगारांची माहिती मिळाली होती. त्यानुसार उत्तर प्रदेश तसेच इतर ठिकाणी सापळे रचून चौघांना अटक करण्यात आली. सूरज जिलेदार सिंग (३२), राजकुमार लालबहादूर सिंग ठाकूर (४२), राजकुमार रामकुमार पांचाळ (४३) व पूजा जाधव (३२) अशी त्यांची नावे आहेत. पांचाळ हा मध्यप्रदेशचा असून कोपर खैरणेत रहायला आहे. तो नवी मुंबईत ठिकठिकाणी बंद घरांची रेकी करून एखादा रो हाऊस जास्त दिवस बंद असल्याचे दिसून येताच बाकीच्या साथीदारांना त्याची माहिती देऊन बोलवून घ्यायचा. तर ठरलेल्या ठिकाणी घरफोडी केल्यानंतर सर्वजण पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी निघून जायचे.
वाशीतील गुन्ह्याच्या तपासात सहायक निरीक्षक तायडे यांच्या पथकाला तायडे बद्दल माहिती मिळाली असता अधिक तपासात तो सूरज व इतरांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. त्यानुसार उत्तर प्रदेशमधून सूरजला अटक केल्यानंतर इतर दोघांना पकडण्यात आले. दरम्यान त्याने चोरीला ऐवज त्याच्या भाऊजीकडे ठेवत असल्याचेही समोर आले असता राजकुमार ठाकूर यालाही अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून ९ गुन्ह्यांची उकल होऊन त्यामधील ३० लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. या टोळीवर नवी मुंबई, ठाणे, मुंबई याशिवाय गुजरात, राजस्थान येथे देखील घरफोडीचे ५० हुन अधिक गुन्हे दाखल आहेत.
फक्त रो हाऊसवर लक्ष
वाशी, कोपर खैरणे परिसरातल्या रो हाऊसवर या टोळीचे लक्ष असायचे. दाट लोकवस्तीपासून वेगळा भाग असल्याने व श्रीमंतांचे वास्तव्य असल्याने या टोळीकडून फक्त रो हाऊसची रेकी करून त्याच ठिकाणी घरफोडी केली जायची. त्यामुळे या टोळीने आजवर कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हडपला आहे.
संपर्कासाठी व्हाट्सअपचा वापर
सूरज हा सराईत गुन्हेगार असून १५ हुन अधिक वर्षांपासून तो घरफोडी करत आहे. एकमेकांसोबत फोनवर बोलल्यास पकडले जाऊ, या भीतीने सर्वजण डोंगलचे इंटरनेट वापरून व्हाट्सअपवर एकमेकांना संपर्क करत होते. त्यामुळे तांत्रिक तपासातही ते पोलिसांना चकमा देत होते. अखेर वाशीतल्या गुन्ह्यात ठश्यावरून पोलिस त्यांच्यापर्यंत पोचले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"