- नामदेव मोरेनवी मुंबई - विधानसभा निवडणुकीपुर्वी नवी मुंबईमध्ये महायुतीला झटका बसला आहे. ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदार संघ भाजपाला सुटणार असल्यामुळे शिंदेसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तुतारी हातात घेणार आहेत.
ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये महायुतीच्या घटकपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. दोन्ही मतदार संघामध्ये भाजपाचे आमदार आहेत. परंतु एक मतदार संघ मिळावा यासाठी शिंदे सेनेचे नेते आग्रही होते. मागील काही महिन्यांपासून दोन्ही मतदार संघामध्ये शिंदेसेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु सोमवारी दिल्ली व राज्यातील भाजप नेत्यांबरोबर स्थानीक भाजपा नेत्यांची चर्चा झाल्यानंतर दोन्ही मतदार संघ भाजपाला सुटणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे संदेश शहरभर पसरले. यामुळे शिंदे सेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांची घराणेशाही रोखण्यासाठी कोणत्याही स्थितीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
बेलापूर मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी उपनेते विजय नाहटा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून तुतारी हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अन्याय सहन केला जाणार नाही. नवी मुंबईत राजकीय उद्रेक झाला तर वरिष्ठांनी आश्चर्यचकीत होऊ नये असे संदेश पाठविण्यास सुरूवात केली आहे. लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेवून अधिकृतपणे पक्षांतराचा निर्णय घेतला जाणार आहे.
२०१९ मध्येही ऐन वेळी दोन्ही मतदार संघ भाजपाला देण्यात आले. २०२४मध्येही पुन्हा दोन्ही मतदार संघ भाजपाला सोडले जाणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. येथील नाईकांची घराणेशाही मोडीत काढण्यासाठी निवडणूक लढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला असून योग्य निर्णय लवकरच घेतला जाईल.विजय नाहटा, उपनेते शिंदेसेना