वैभव गायकर,पनवेल: प्रत्येकाला पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत उपचार आयुष्मान भारत योजने अंतर्गत केले जातात. याकरिता शासनाच्या वतीने मोफत आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले आहेत.याच दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयात 'आयुष्मान भारत' क्यू आर कोड स्कॅनर बसविण्यात आली आहे. यामुळे रुग्णाला घरात बसवून उपजिल्हा रुग्णालयात ओपीडीची वेळ निश्चित करता येणार आहे.
'आयुष्मान भारत' डिजिटल स्कॅनवर ऑनलाइन स्वरूपात नोंदवलेले आपले नाव या मशीनवर स्कॅन करून रुग्णाला टोकन वितरित केले जाणार आहे. त्यानुसार रुग्णाला हवी असलेल्या ओपीडी मध्ये विना रांगेत उभे राहून रुग्णाला आपल्या डॉक्टरला भेटता येणार आहे.याकरिता पनवेल उपजिल्हा रुग्णालयात तीन तंत्रज्ञ देखील नियुक्त करण्यात आले आहेत.त्यांच्या माध्यमातून याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना या स्कॅनिंग करून आपला नाव स्कॅन करता येणार आहे.
दररोज किमान तीनशे जणांचे याठिकाणी स्कॅनिंग केले जात असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ बालाजी फाटक यांनी दिली.या ऑनलाईन प्रणालीमुळे रुग्णाची सर्व माहिती डिजिटल होणार आहे.डॉक्टर ई सुस्कृत या ऍप वर रुग्णाची हिस्टरी पाहून त्याची नोंद ऑनलाईन ठेवली जाणार आहे.पुढे हीच माहिती मेडिकल ,लॅब तसेच इतर ठिकाणी देखील ऑनलाइन पाहता येणार आहे.
पनवेल उपजिल्हा रुग्णालय हे गरीब व गरजु रुग्णांसाठी अत्यंत महत्वाचे समजले जात आहे.याठिकाणी दररोज ५०० ते ५५० ओपीडी असते. १२० खाटांच्या रुग्णालयात सद्यस्थितीत ८० खाटावर रुग्ण भरती आहेत.
प्रतिक्रिया -
एबीडीएमवर रुग्णांनी ऑनलाईन केलेली नोंदणी स्कॅन केली जाणार आहे.यामुळे रुग्णांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.रुग्णाची सर्व माहिती डिजिटल झाल्यास रुग्णाला आपल्या सोबत फाईलींचे ओझे सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही.- डॉ बालाजी फाटक (अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालय पनवेल )