नवी मुंबई: नवी मुंबई परिसरात सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वादळामुळे नेरूळ, वाशी, ऐरोली, कोपरखैरणेत १५ वृक्ष कोसळले. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
तीव्र उकाड्यामुळे एप्रिल पासून नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. दुपारी घराबाहेर काम करणे असह्य होऊ लागले होते. निवडणूक प्रचार ही १२ वाजेपुर्वी बंद करावा लागत होता. सोमवारी तीन नंतर वादळास सुरूवात झाली. पामबीच रोडसह सायन पनवेल महामार्गावरही मोठ्याप्रमाणात धूळीचे थर तयार झाले होते. चारपासून सर्व परिसरात पाऊस सुरू झाला. पाऊस व वादळामुळे पामबीच रोडवर वाशीमध्ये दोन वृक्ष कोसळले. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.
अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांचीही धावपळ झाली. उन्हाळी पोहण्याचे व इतर खेळांच्या शिबीरास ही सुटी देण्यात आली.
बसस्टॉप व पुलाखाली गर्दी
पाऊस आल्याने मोटारसायकलस्वारांनी पामबीच रोडवरील वाशीतील पुलाखाली व बसस्टॉपचा आधार घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. विजांच्या आवाजामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते.