नेरूळच्या ग्रँड सेंट्रलमध्ये आता फार्मास्युटिकल लॅबोटरी, निवासी भागाचा होणार औद्योगिक वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 08:05 PM2022-11-19T20:05:25+5:302022-11-19T20:06:15+5:30
इव्हॉनिक इंडिया प्रा. लिमिटेड ही कंपनी भूखंड क्रमांक आर-१ सेक्टर-४० येथे बांधलेल्या टॉवरमधील पहिल्या माळ्यावरील सी-१०१, नवव्या आणि ११ माळ्यावरील ए. बी. सी. या तिन्ही विंगमध्ये आपली लॅबोटरी सुरू करणार आहे.
नारायण जाधव
नवी मुंबई - राज्य शासनाने आणलेल्या एकात्मिक बांधकाम नियमावलीतील तरतुदींचा फायदा घेऊन नेरूळ रेल्वेस्थानकातील एल ॲन्ड टी कंपनीने बांधलेल्या ग्रँड सेंट्रल मॉलच्या परिसरातील एका टॉवरमध्ये फार्मास्युटिकल, न्यूट्रास्युटिकल आणि फूड फॉर्म्युलेशन लॅबोटरी उभारण्याचा प्रस्ताव आला आहे. सध्या हा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या तांत्रिक समितीसमोर सादर करण्यास कंपनीस सांगितले आहे. मात्र, निवासी भागात येऊ घातलेल्या या लॅबोटरीमुळे प्रदूषण होण्याची भीती असल्याने येथील उचभ्रू टॉवरमध्ये घरे घेतलेले सदनिकाधारक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
नेरूळ रेल्वेस्थानकातील एल ॲन्ड टी कंपनीने बांधलेल्या ग्रँड सेंट्रल मॉलच्या भूखंड क्रमांक आर-१ सेक्टर ४० वर उभारलेल्या टॉवरमध्ये इव्हॉनिक इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीने फार्मास्युटिकल, न्यूट्रास्युटिकल आणि फूड फॉर्म्युलेशन लॅबोटरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी ईटीपी आणि एसटीपी प्लॉन्टसाठीचा प्रस्ताव कंपनीने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २० ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या समंती कमिटीच्या बैठकीत सादर केला होता. मात्र, एल ॲन्ड टी कंपनीस यापूर्वी २९ ऑक्टोबर २०१८ मध्ये जी एनओसी दिली आहे, ती केवळ निवासी आणि वाणिज्यिक वापरासाठी आहे. परंतु, आता इव्हॉनिक इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीने औद्योगिक वापरासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. तो आधीच्या एनओसीला लागू होत नाही. कारण यामुळे औद्योगिक, रासायनिक प्रदूषण होण्याची भीती आहे. ती ओळखून याविषयी सदर कंपनीला मंडळाने तांत्रिक समितीवर सादरीकरण करण्यास सांगितले आहे. तो पर्यंत कंपनीला फार्मास्युटिकल, न्यूट्रास्युटिकल आणि फूड फॉर्म्युलेशन लॅबोटरी उभारता येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
याठिकाणी होणार औद्योगिक वापर
इव्हॉनिक इंडिया प्रा. लिमिटेड ही कंपनी भूखंड क्रमांक आर-१ सेक्टर-४० येथे बांधलेल्या टॉवरमधील पहिल्या माळ्यावरील सी-१०१, नवव्या आणि ११ माळ्यावरील ए. बी. सी. या तिन्ही विंगमध्ये आपली लॅबोटरी सुरू करणार आहे. येथे ध्वनी, रासायनिक प्रदूषण होण्याची दाट शक्यता आहे. येथे निवासी आणि वाणिज्यिक वापर सुरू आहे. यामुळे ग्रँड सेंट्रलमधील सदनिकाधारक, दुकानमालक, विविध कार्यालयातील कर्मचारी आणि स्थानिक राजकीय नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.