लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सिंगापूर येथे नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामध्ये १ कोटी ७६ लाखाचा अपहार समोर आला असून त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
एपीएमसी मधील कमोडिटी एक्स्चेंज इमारतीमध्ये कार्यालय थाटून हा प्रकार घडला आहे. सिंगापूर मधील हॉटेलमध्ये नोकरीची जाहिरातबाजी संबंधितांकडून करण्यात आली होती. त्याला भुलून गरजू तरुणांनी नोकरीसाठी इच्छुकता दर्शवली होती. यावेळी नोकरीला लावण्यासाठी तसेच इतर विविध कारणांनी त्यांच्याकडून पैसे उकलण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र पैसे घेतल्यानंतरही त्यांना नोकरीला लावण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर संधी मिळताच संबंधितांनी कार्यालय गुंडाळून पळ काढला आहे.
त्यांनी १ कोटी ७६ लाखाचा अपहार केल्याचे अद्याप पर्यंत समोर आले असून त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.