खारघरमधील दुर्घटनेत विरार येथील श्री सदस्याचा उपचारादरम्यान मृत्यू; मृतांचा आकडा 14
By वैभव गायकर | Published: April 18, 2023 08:10 PM2023-04-18T20:10:26+5:302023-04-18T20:10:54+5:30
अद्यापही सात जणांवर तीन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पनवेल : खारघर मधील महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा 14 वर पोहचला आहे. वाशी एमजीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 34 वर्षीय स्वाती राहुल वैद्य रा. विरार यांची प्राणज्योत दि.18 रोजी मावळली. अद्यापही सात जणांवर तीन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये एमजीएम वाशी 2, खारघर मेडिकव्हर 1 आणि कामोठे एमजीएम रुग्णालयात 4 रुग्ण उपचार घेत आहेत.सर्वांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिली.पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन पार पडल्यानंतर हा मृतदेह विरार येथे पाठविण्यात आले.दरम्यान उर्वरित रुग्णांना देखील पुढील काही दिवसात डिस्चार्ज देण्यात येणार आहे.महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला या घटनेमुळे गालबोट लागले.या घटनेनंतर आरोग्य विभागाने तत्काळ आपली भूमिका बजावली आहे.
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ आनंद गोसावी,उपायुक्त सचिन पवार,उपायुक्त गणेश शेटे,उपायुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त कैलास गावडे,सहाय्यक आयुक्त डॉ वैभव विधाते यांच्यासह चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी मागील दहा दिवसांपासुन कार्यक्रमस्थळी त्यानंतर उदभवलेल्या अत्यावश्यक परिस्थितीला सामोरे जात होते.मंगळवारी प्रशासकीय पातळीवर परिस्थिती पूर्वपदावर आली.पालिकेचा तसेच महसूल विभागाचे कामकाज सुरळीतपणे सुरु झाले.पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांनी देखील नियोजनात विशेष मेहनत घेतली.घटनेतील मयत मृतदेह त्यांच्या नातेवाईकांपर्यंत ऍम्ब्युलन्स मध्ये पोहचविण्याची व्यवस्था तळेकर यांनी केली.