ऐन पावसाळ्याच्या मध्यावर तुर्भेत पाणी टंचाई; शिवसेनेचा हांडा मोर्चा
By नामदेव मोरे | Published: August 18, 2023 12:06 PM2023-08-18T12:06:20+5:302023-08-18T12:06:30+5:30
तुर्भे विभागामधील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरामधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: नवी मुंबईतील इंदिरानगर व इतर झोपडपट्टी परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी मिळत नसल्याने त्रस्त नागरिकांनी महानगर पालिका विभाग कार्यालयावर हांडा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला.
तुर्भे विभागामधील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरामधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळ दोन - दोन दिवस पाणी येत नाही. रात्री अपरात्री पाणी येत असल्यामुळेही नागरिकांची गैरसोय होत आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे रहिवासी त्रस्त आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण आहे. नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा केला जात असल्याचा दावा महानगरपालिका करत आहे. परंतु इंदिरानगर झोपडपट्टीमधील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. हा प्रश्न साेडविण्यासाठी १८ ऑगस्टला हंडा मोर्चा काढला.
सिडको विकसीत नोडप्रमाणे सकाळी व सायंकाळी नियमीत वेळेत पाणी पुरवठा करण्यात यावा. इंदिरानगर झोपडपट्टीलाही एमआयडीसीऐवजी मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यात यावा. पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आवश्यक जलकुंभ, जलवाहिन्या टाकण्यात याव्यात अशा मागण्या केल्या. यावेळेस जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, उपशहरप्रमुख महेश कोठीवाले, प्रकाश पाटील, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर,सिद्धाराम शिलवंत यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.