नवी मुंबई : शेती उत्पादनात गुंतवणूक करून महिना ५ टक्के नफा आणि ११ महिन्यांनी मूळ रक्कम परत मिळवा, अशी जाहिरात करून रुद्रा ट्रेडर्स नावाची फर्म नावाच्या कंपनीने एजंटद्वारे सुमारे ३०० लोकांची अंदाजे २६ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत आलेल्या तक्रार अर्जाची छाननी करून संबंधित आरोपींविरोधात एपीएमसी पोलिसांत गुन्हा नोंद करून तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. नितीन पार्टे, दीपक सुर्वे, अमोल जाधव सचिन भिसे अशी यातील आरोपींची नावे असून यापैकी मुख्य आरोपी पार्टे, व अन्य दोघांना अटक केली आहे तर एकाचा शोध सुरू आहे.वाशीतील आलिशान व्यावसायिक संकुल ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गावरील सतरा प्लाझात कंपनीचे कार्यालय आहे. मसाला आणि सुका मेवा याचबरोबर थेट शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करून निर्यात करण्याचे काम ही कंपनी करत असल्याचे भासवले जात होते. यातील आरोपी पार्टे हा लक्ष्मीप्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पतसंस्थेचा संचालकही आहे. या दोन्हींच्या जीवावर पार्टे याने ३०० गुंतवणूकदारांची २६ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
यातील व्यवहार पारदर्शक भासवण्यासाठी लक्ष्मी प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे धनादेश, फिक्स डिपॉझिट बॉण्ड गुंतवणूकदारांना मार्च २०२२ पासून दिले जात होते. मात्र परताव्याचे पैसे मिळत नाहीत आणि ज्यांनी पैसे घेतले ते उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने महेंद्र डेरे या गुंतवणूकदाराने एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याची तत्काळ दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक अशोक दामले, पोलिस उपनिरीक्षक नीलेश महाडिक यांचे पथक नेमले. या पथकाने आरोपींना गाफील ठेवून तपास सुरू केला. यात सर्व प्रकाराची खात्री पटल्यावर गुरुवारी रात्री आरोपींना अटक केली. या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांनी पुढाकार घेत एपीएमसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील उरण येथे काही महिन्यांपूर्वी कोट्यवधींचा चिटफंड घोटाळा समोर आला होता. याप्रकरणी स्वतः पोलिसांनी पुढाकार घेत कारवाई केली व आरोपींना गजाआड केले. आता अशाच प्रकारचा चिटफंड घोटाळा समोर आला आहे.