नवी मुंबई महापालिकेत उपरेच बनले कारभारी, सर्व उपायुक्त शासनाचे; अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

By नामदेव मोरे | Published: August 31, 2023 10:05 AM2023-08-31T10:05:36+5:302023-08-31T10:05:59+5:30

आता एका उपायुक्ताला कायमस्वरूपी समायोजन म्हणून नियुक्ती दिल्यामुळे मनपामध्ये वर्षांनुवर्ष काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. 

In the Navi Mumbai Municipal Corporation, the above became stewards, all the Deputy Commissioners of the Government; Dissatisfaction among officials, employees | नवी मुंबई महापालिकेत उपरेच बनले कारभारी, सर्व उपायुक्त शासनाचे; अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

नवी मुंबई महापालिकेत उपरेच बनले कारभारी, सर्व उपायुक्त शासनाचे; अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

googlenewsNext

नवी मुंबई : शासनाने प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार एकवटला आहे. दोन अतिरिक्त आयुक्त, दहा उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, नगररचनाकार, मुख्य लेखा व वित्तअधिकारी, मुख्य लेखापरीक्षक व तीन सहायक आयुक्त या सर्वांना नगरविकास विभागाने प्रतिनियुक्तीवर महानगरपालिकेत नेमले आहे. आता एका उपायुक्ताला कायमस्वरूपी समायोजन म्हणून नियुक्ती दिल्यामुळे मनपामध्ये वर्षांनुवर्ष काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. 

ग्रामपंचायतीमधून थेट महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालेली नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका आहे. पहिल्या वर्षी ५० कोटीपेक्षा कमी अर्थसंकल्प असलेल्या नवी मुंबईने ३० वर्षांमध्ये ४९२५ कोटींचा अर्थसंकल्प तयार करण्यापर्यंत मजल मारली आहे.  प्रगतीचे हे टप्पे पार करण्यासाठी येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम केले. परंतु, मागील काही वर्षांमध्ये महापालिकेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना वाढू लागली आहे. महानगरपालिकेमधील दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी एक मनपाच्या सेवेतील असावा, दहापैकी पाच उपायुक्त मनपा सेवेतील असावे, विभाग अधिकारी मनपा सेवेतील असावेत, अशी अपेक्षा आहे. 

महानगरपालिकेतील प्रतिनियुक्तीवर अधिकारी व त्यांच्याकडील पदभार
अधिकाऱ्याचे नाव              पद
विजयकुमार म्हसाळ      अतिरिक्त आयुक्त 
सुजाता ढोले     अतिरिक्त आयुक्त 
शरद पवार     उपायुक्त प्रशासन 
दिलीप नेरकर     उपायुक्त उद्यान
बाबासाहेब राजळे     उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन
मंगला माळवे     उपायुक्त भांडार 
श्रीराम पवार     उपायुक्त समाज विकास 
सोमनाथ पोटरे     उपायुक्त अतिक्रमण 
ललिता बाबर     उपायुक्त क्रीडा 
दत्तात्रेय घनवट     उपायुक्त शिक्षण
योगेश कडुसकर     परिवहन व्यवस्थापक
डॉ. राहुल गेठे     उपायुक्त 
सोमनाथ केकाण     नगररचनाकार
सत्यवान उबाळे     मुख्य लेखा व वित्त अधिकारी 
जितेंद्र इंगळे     मुख्य लेखापरीक्षक 
प्रबोधन मावडे     सहायक आयुक्त, नेरूळ 
मिताली संचेती     सहायक आयुक्त, वाशी
सागर मोरे     सहायक आयुक्त, कोपरखैरणे

कर्मचारी युनियनचा न्यायालयात जाण्याचा इशारा
    शहर अभियंता, महानगरपालिका सचिव व पाच सहायक आयुक्त एवढेच विभाग प्रमुख मूळ महानगरपालिकेमधील आहेत. 
    शासनाने नुकतीच डॉ. राहुल गेठे यांची उपायुक्तपदावर वर्णी लावली आहे. यापूर्वीची उपायुक्तांची नियुक्ती २ किंवा ३ वर्षांसाठी होती. 
    गेठे यांची नियुक्ती कायमस्वरूपी केल्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 
    घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांना कायम करण्याच्या हालचाली सुरू असल्यामुळे महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनीही विरोध  केला आहे. 
    इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनीही गेठे यांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे. 
    प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनेक जण दुय्यम स्थानावर
यापूर्वी एक अतिरिक्त आयुक्त, सर्व विभाग अधिकारी, उपायुक्त मनपाच्या सेवेतीलच होते. मागील पाच वर्षांत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली. यामुळे पालिकेमध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना दुय्यम पदावर समाधान मानावे लागते.

दहा उपायुक्तांचा समावेश
सद्यस्थितीमध्ये महानगरपालिकेमधील दोन्हीही अतिरिक्त आयुक्तांसह सर्व दहा उपायुक्त शासनाचेच असून, तीन सहायक आयुक्त, नगररचनाकार, मुख्यलेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखापरीक्षकही प्रतिनियुक्तीवरील आहेत. 

महानगरपालिकेमध्ये नुकतीच उपायुक्तांची झालेली नियुक्ती नियमबाह्य आहे. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.
- रवींद्र सावंत, अध्यक्ष, 
इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियन

Web Title: In the Navi Mumbai Municipal Corporation, the above became stewards, all the Deputy Commissioners of the Government; Dissatisfaction among officials, employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.