नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीने पावसाळा पूर्व नालेसफाई योग्य पद्धतीने केलेली नाही. पहिल्याच पावसात प्रशासनाच्या निष्काळजीपणाची पोलखोल झाली असून कांदा - बटाटा मार्केट जलमय झाले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मार्केटला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रोडवर खड्डे पडले आहेत. डीपी बॉक्स उघडे असून गटारे गाळाने भरून गेली आहेत.
राज्यातील ३०६ बाजार समित्यांची शिखर संस्था व आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे. परंतु मागील काही वर्षांपासून बाजारपेठेमधील अत्यावश्यक कामेही वेळेवर होत नाहीत. कांदा - बटाटा मार्केट धोकादायक घोषीत झाले असल्यामुळे प्रशासन गटर दुरूस्ती, नालेसफाई, खड्डे दुरूस्ती व इतर अत्यावश्यक कामेही वेळेत करत नाही. पावसाळा जवळ आल्यानंतरही अत्यावश्यक कामे केली जात नसल्यामुळे कांदा बटाटा अडत व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
मुख्यमंत्र्यांनी अत्यावश्यक कामे करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने पाहणी दौरा केला परंतु प्रत्यक्षात ठोस कामे झाली नाहीत. पहिल्याच पावसात संपूर्ण मार्केट जलमय झाले आहे. सर्व विंगमध्ये पाणी साचले आहे. गटारे तुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा हाेत नाही. मार्केटमधील रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचून तळी तयार झाली आहेत. मार्केटमधील सर्व विद्यूतडीपी बॉक्सची झाकणे उघडी आहेत. मार्केटमधील गटाराच्या झाकणाच्या ठिकाणचा भाग खचला आहे.तेथे धोक्याचा सूचना फलक लावण्यात आलेला नाही.
कांदा बटाटा मार्केटमध्ये पहिल्याच पावसाने प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडा केला आहे. अशीच स्थिती राहिली तर संपूर्ण पावसाळ्यात व्यापार कसा करायचा असा प्रश्न व्यापारी व कामगार व्यक्त करू लागले आहेत. गटारात पाणी साचत असल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे. डेंग्यू व मलेरीयाची साथ पसरण्याचा धोकाही वाढला आहे. गटारांवरील झाकणेही तुटली आहेत. अशा स्थितीमध्ये व्यापार करायचा कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.