पनवेल - कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक चिंताग्रस्त होवून घरात बसले असताना नवीन पनवेलच्या काही भागांत घरात बसलेल्या नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. मागील आठवड्यापासून कमी दाबाने पाणिपुरवठा होत आहे. त्यामुळे नवीन पनवेलच्या काही भागातील नागरिक सध्या त्रस्त आहेत. नवीन पनवेल सेक्टर ६, १० आणि १९ मध्ये ही तक्रार असल्याचे नागरिकांनी सांगितले. सेक्टर १९ मध्ये राहणारे ज्ञानेश्वर पाटील यांनी सिडकोच्या पाणिपुरवठा विभागाकडून दोन दिवसांपासून तक्रार केली मात्र पाणि संध्याकाळी येईल, सकाळी येईल अशी कारणे सांगितली जात आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या शटडाऊनमुळे पाण्याचा तुटवडा असल्याचे ज्ञानेश्वर पाटील यांना सिडकोचे पाणिपुरवठा विभागातील अभियंता राहूल सरोदे यांनी सांगितले. सेक्टर १९ मधील काही इमारतीमध्ये खासगी टँकरने पाणिपुरवठा करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. चार दिवसानंतर अखेर मंगळवारी दुपारी पाणि आले मात्र पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे पुरेसे पाणि नागरिकांना मिळाले नाही.खारघर मध्येही अपुरा पाणीपुरवठा खारघर शहरासह आजूबाजूचे गाव आदिवासी वाड्यामध्ये सध्याच्या घडीला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत .शहरातील रांजणपाडा गावात मागील महिनाभरापासून भीषण पाणी समस्या असताना स्थानिक नगरसेवक पालीका प्रशासन काहीच कारवाई करीत नसल्याचे येथील ग्रामस्थ मच्छिद्र चौधरी यांचे म्हणणे आहे.शहरातील धामोळे आदिवासी वाडीत देखील हीच समस्या आहे.
अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पनवेलमध्ये नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:58 AM