तहकूब विषयाला परस्पर मंजुरी!
By admin | Published: October 1, 2016 02:57 AM2016-10-01T02:57:51+5:302016-10-01T02:57:51+5:30
पनवेल शहर महानगरपालिका अस्तित्वात येत असल्याने नागरिकांबरोबरच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १ आॅक्टोबरपासून पनवेल महापालिकेवर प्रशासक बसणार
- वैभव गायकर, पनवेल
पनवेल शहर महानगरपालिका अस्तित्वात येत असल्याने नागरिकांबरोबरच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १ आॅक्टोबरपासून पनवेल महापालिकेवर प्रशासक बसणार असल्याने सत्ताधाऱ्यांनी घाईघाईत महानगर गॅस कंपनीच्या पाइपलाइन टाकण्याच्या तहकूब असलेल्या विषयाला परस्पर मंजुरी दिल्याने विरोधकांनी शुक्रवारी मुख्याधिकारी मंगेश चितळे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन देऊन हा ठराव रद्द करण्याची मागणी केली.
महानगर गॅससाठी परवानगी मिळावी म्हणून नगरपालिकेस तीन अर्ज करण्यात आले होते. मात्र त्या तिन्ही विषयाला वारंवार पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थगिती मिळून ते विषय तहकूब करण्यात आले होते. यासंदर्भात सर्वपक्षीय समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र २५ सप्टेंबर रोजी या विषयी कोणतीही बैठक न घेता नगराध्यक्षांनी परस्पर अधिकाराने सही करून ठराव केले असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुडेकर व विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी केला आहे.
यासंदर्भात मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना भेटून उचित कारवाईची मागणी केली आहे. ठराव मंजूर करण्यामागे आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप पाटील यांनी केला. निवेदन देताना विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांच्यासह शिवसेना पक्ष प्रतोद रमेश गुडेकर, गणेश कडू, शिवदास कांबळे, निर्मला म्हात्रे, सुनील बहिरा आदी यावेळी उपस्थित होते .
महानगरपालिकेच्या अंतिम मंजुरीने पनवेल नगरपरिषदेचा कार्यकाळ आज संपणार असून शेवटचा दिवस होता. १ आॅक्टोबरपासून प्रशासक बसणार असल्याने शेवटचा दिवस देखील वादात पार पडल्याचे दिसून आले.
महानगर गॅस कंपनीच्या संदर्भात यापूर्वी झालेल्या दोन्ही बैठकांना मी उपस्थित नव्हतो. यासंदर्भात शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- मंगेश चितळे, मुख्याधिकारी , पनवेल नगरपरिषद
हा ठराव पनवेलच्या जनतेच्या भल्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले नाही.
- चारु शीला घरत,
नगराध्यक्षा, पनवेल नगरपरिषद