कमलाकर कांबळे /नवी मुंबई
नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील मागील ४ महिन्यांपासून तयार झालेले दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेरपर्यंत सुरू करा, अन्यथा रेल्वे रोको करून दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले जाईल, असा इशारा ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी दिला आहे. या संदर्भात खासदार विचारे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी व मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांना पत्र पाठविले आहे.
दिघा स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे स्थानक प्रवाशांसाठी खुले करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. त्या अनुषंगाने खासदार या नात्याने आपण अनेकदा रेल्वेमंत्र्याकडे स्थानकाच्या उद्घाटनाबाबत विनंती केली. त्यानंतरही उद्घाटन होत नसल्याने नागरिकात नाराजीचे सूर आहेत. रेल्वे प्रशासनाकडे दिघा स्थानकाच्या उद्घाटनासाठी वेळ नसेल तर रेल्वे प्रवासी आणि दिघावासीयांच्या सहभागाने आम्हीच या स्थानकाचे उद्घाटन करू असा इशारा खासदार राजन विचारे यांनी या पत्राद्वारे दिला आहे. दिघा परिसरात नव्याने सुरू होणाऱ्या आयटी कंपन्या व त्यामध्ये बाहेरून येणारा नोकरदार वर्गाला सध्या ऐरोली किंवा ठाणे रेल्वे स्थानकाचा आधार घ्यावा लागतो. यात प्रवाशांचा वेळ आणि पैशाचा अपव्य होत आहे. या पार्श्वभूमीवर दिघा स्थानक सुरू झाल्यास सर्व घटकांना त्याचा लाभ होईल असेही विचारे यांनी स्पष्ट केले आहे.