दस-याच्या मुहूर्तावरकोपरीतील अॅम्युजमेंट पार्कचे लोकार्पण, अत्याधुनिक दर्जाच्या खेळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 05:35 AM2017-10-01T05:35:02+5:302017-10-01T05:35:07+5:30
महापालिकेच्या माध्यमातून कोपरी येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अॅम्युजमेंट पार्कचे दसºयाच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले.
नवी मुंबई : महापालिकेच्या माध्यमातून कोपरी येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अॅम्युजमेंट पार्कचे दसºयाच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले. महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पार्कचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले.
कोपरी परिसरात मुलांना खेळण्यासाठी व मनोरंजनासाठी एकही उद्यान नव्हते. त्यामुळे या परिसरात एक अत्याधुनिक स्वरूपाचे उद्यान विकसित करावे, अशी मागणी या क्षेत्रातील रहिवाशांची होती. त्यानुसार महापालिकेने कोपरी सेक्टर २६ येथे सुमारे दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर हे अॅम्युजमेंट पार्क साकारले आहे. या पार्कमध्ये अत्याधुनिक स्वरूपाची विविध खेळणी आहेत. विशेषत: पार्कमधील महाकाय कासवाची प्रतिकृती हे प्रमुख आकर्षण ठरले आहे. त्याशिवाय लहान मुलांसाठी खास प्ले झोन असून, खेळताना दुखापत होऊ नये, यादृष्टीने उच्च दर्जाच्या रबर मॅटचे फ्लोरिंग टाकण्यात आले आहे. स्केटिंग रिंग, इव्हेंट प्लाझा, ज्येष्ठांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आदी दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या पार्कचे वेगळेपण नवी मुंबईच नव्हे, तर इतर शहरांतून येणाºया नागरिकांनाही भुरळ घालणारे असल्याचे प्रतिपादन महापौर सुधाकर सोनवणे यांनी या वेळी केले. तर शहरात सध्या अडीचशेपेक्षा अधिक उद्याने आहेत. त्यात आता कोपरीतील उद्यानाची भर पडली आहे. बंगळुरूप्रमाणेच नवी मुंबई शहरालाही आता गार्डन सिटी म्हणून ओळख प्राप्त होत असल्याचे मत
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाला ऐरोलीचे आमदारही उपस्थित होते. तसेच उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, स्थानिक नगरसेविका उषा भोईर आदीसह विविध समितींचे सभापती, उपसभापती, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.