उरण : भारताचे नंबर एकचे पोर्ट असलेले जेएनपीटीने शाश्वत विकास आणि पर्यावरणाच्या सवांदाचा भाग वायू गुणवत्ता नियंत्रण केंद्राची स्थापना केली. या केंद्रातून रिअल टाइम आधारावर, पोर्ट परिसरातील वायू गुणवत्ता, प्रदूषण पातळी आणि इतर संबंधित मापदंडांचेपरीक्षण करण्यात येणार आहे. युनायटेड नेशन्स एनव्हायरमेंट प्रोग्राम (यूएनईपी)द्वारा घोषित करण्यात येणारी या वर्षीची थीम वायुप्रदूषण आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अशा प्रकारचे हरित उपक्रम राबविणे उचित ठरणार आहे, असे जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सांगितले.
या उद्घाटनप्रसंगी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, जेएनपीटीमध्ये आम्ही सतत पर्यावरणाला अनुकूल पर्याय शोधत असतो. ग्रीन पोर्ट बनण्याच्या प्रयत्नात अनेक पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
निरोगी आयुष्यासाठी गुणवत्तायुक्त हवा आणि पाणी हे महत्त्वाचे घटक आहेत आणि म्हणूनच पोर्ट म्हणून आम्ही हवेच्या शुद्धतेवर बारकाईने तपासणी करीत आहोत आणि ती शुद्धता कायम ठेवण्यासाठी वेळेवर सुधारात्मक उपाय करण्यात येत आहेत. या केंद्रामध्ये सुसज्ज नेटवर्क सह पोर्टवरील विविध ठिकाणी अनेक मोबाइल सेन्सर आणि स्थिर सेन्सर असणार आहेत. हे सेन्सर्स प्रत्येक सेकंदाला एकाच वेळी रिझोल्यूशनमध्ये हवामानविषयक विविध घातक स्तराच्या मापदंडांचे परीक्षण करतील.
सेन्सरद्वारे संग्रहित केलेल्या घटकांचे रिअल टाइम बेसिसवर विश्लेषण केले जाईल आणि डिजिटल बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. यात भर म्हणून कालांतराने जमा केलेली माहिती वातावरणासंबंधित उत्तम संग्रह असेल, ज्यामुळे पर्यावरणाच्या परिणामाच्या विविध कलाविषयी आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल.
या वेळी ‘विश्व पर्यावरण दिवस’ उत्सव म्हणून जेएनपीटीने इतर अनेक उपक्रमदेखील आयोजित केले होते. या दिवसाची सुरुवात जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी बंदराचे सर्व कर्मचारी तसेच पोर्ट यूजर्स यांना पर्यावरणा विषयी शपथ देऊन करण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय इमारतीजवळ वृक्षारोपण करण्यात आले. ‘वायुप्रदूषण’ विषयावर एक पथनाट्य आयोजित करण्यात आले होते.