पनवेल : मागील वर्षभरापासून उद्घाटनाच्या बहुप्रतीक्षेत असलेल्या खारघरमधील ग्रामविकास भवनाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नववर्षात २ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ग्रामविकास भवनाचे उद्घाटन होणार आहे. खारघर सेक्टर २१ याठिकाणी भूखंड क्र मांक ७६ अ वर सिडकोने सुमारे १८ कोटी रुपये खर्चून हा बहुउद्देशीय प्रकल्प उभारला आहे . २००७ मध्ये या प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात झाली. तळमजला अधिक पाच मजले अशी या प्रकल्पाची व्याप्ती आहे. या प्रकल्पात ५०० जण बसतील एवढा मोठा प्रेक्षागृह , १०० व्यक्तींची क्षमता असलेली कार्यशाळा, दुहेरी बिछान्या असलेल्या ५७ खोल्या, १२० व्यक्तींची क्षमता असलेले मेजवानी कक्ष आणि स्वयंपाक गृह , ३३ दुकानांशी क्षमता असलेले खरेदी क्षेत्र आदी सुविधा आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता हा समारंभ पार पडणार आहे. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
ग्रामविकास भवनाचे उद्घाटन सोमवारी
By admin | Published: January 01, 2017 3:28 AM