फेरीवाल्यांच्या भूखंडांचे उद्घाटन रद्द
By admin | Published: April 1, 2016 02:51 AM2016-04-01T02:51:49+5:302016-04-01T02:51:49+5:30
खारघर शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोहीम उघडली होती.
पनवेल : खारघर शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोहीम उघडली होती.
अनधिकृत फेरीवाल्यांना हटवून त्यांना मार्केट उपलब्ध करुन देण्याची आग्रही भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली होती. त्यानंतर सिडकोने तात्पुरत्या स्वरुपात २४ भूखंड देण्याचे मान्य केले होते. यापैकी काही भूखंडांचे उद्घाटन गुरुवार ३१ रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडणार होते तशी तयारीही पूर्ण झाली होती. मात्र ऐन वेळी उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द झाल्याने यामागचे कारण मात्र स्पष्ट होवू शकले नाही.
विशेष म्हणजे फेरीवाल्यांच्या प्रश्नावरुन भाजपा-शिवसेना अनेक दिवस आमनेसामने आलेले आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी मात्र दोन्ही पक्ष एकत्र झाल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे उद्घाटनासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे खारघरमध्ये देखील आले होते. मात्र कोणत्या कारणास्तव त्यांनी उद्घाटन करण्यास नकार दिला हे स्पष्ट झाले नाही. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. या सर्व घटनाक्रमानंतर भाजपाचे शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल हे शिष्टमंडळासह खारघर सिडको कार्यालयात गेले. सिडकोमार्फत फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती सिडकोकडे केली.