नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:50 AM2024-09-19T05:50:00+5:302024-09-19T05:50:18+5:30
उद्योजकांना कोणीही त्रास दिल्यास त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली.
नवी मुंबई : राज्यात अनेक गेमचेंजर प्रकल्प येत आहेत. उद्योगांना पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात उद्योग वाढावेत, यादृष्टीने उद्योजकांना सबसिडीसह विविध सवलती आणि सुविधा प्रदान केल्या जात आहेत. त्यामुळे उद्योजकांना कोणीही त्रास दिल्यास त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली.
नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या आरआरपी इलेक्ट्राॅनिक्सच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच पद्मविभूषण अनिल काकोडकर, सुप्रसिद्ध क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकर, आरआरपी इलेक्ट्राॅनिक्सचे राजेंद्र चोडणकर उपस्थित होते.
सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दावोसमध्ये करोडो रुपयांचा गुंतवणूक करार केला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातसुद्धा उद्योगांना पोषक वातावरण निर्माण केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
आरआरपीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेला हा राज्यातील सेमी कंडक्टरचा पहिला प्रकल्प उभारला जात आहे. तोही एका मराठी उद्योजकाने उभारल्याचा विशेष आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींची गुंतवणूक
देशातला सर्वांत मोठा सेमी कंडक्टर प्रकल्प नवी मुंबईत उभारला जात आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित धरण्यात आली आहे. त्यानंतर २४ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. एकूणच हा संपूर्ण प्रकल्प ३६ हजार कोटींचा असणार आहे. तसेच याच क्षेत्रात ८३ हजार कोटींची गुंतवणूक असलेली टॉवर्स नावाची कंपनी आपला उद्योग सुरू करणार आहे. एकूणच येत्या काळात नवी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार असून, त्यामुळे लाखो रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.