नवी मुंबई: सेवा पंधरवाडा निमित्त कोंकण भवनमध्ये उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. कोकण विभागीय उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरिष भालेराव, सेवा व कर सहआयुक्त अपिल रमेश जैद यांनी स्वत:चा सेल्फी काढून या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी विभागीय सहाय्यक भाषा संचालक योगेश ल. शेट्ये, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे तसेच कोकण भवनातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्ज आणि प्रलंबित कामांवर कालमार्यादेत निपटारा व्हावा, यासाठी राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यात नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. कोकण भवनात विविध विभागांची प्रशासकीय व विभागीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी भेटी देत असतात. सेवा पंधरवडा या विशेष सेवेची जनजागृती व्हावी, शासनाच्या या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, या हेतूने उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांच्या संकल्पनेतून कोकण विभागीय माहिती कार्यालयामार्फत ‘सेल्फी पॉईंट’ उभारण्यात आला आहे. या सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी.बी.टी., नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा वेब पोर्टलवर 10 सप्टेंबर 2022 पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. मदत आणि पूनर्वसन, कृषि, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्राम विकास, आरोग्य, पाणी पुरवठा, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचा समावेश करण्याता आला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण करणे, तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, फेरफार नोंदीचा निपटारा करणे, शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अतंर्गत सिंचन विहिरी करिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मजूर करणे (अपिल वगळून),दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा 14 सेवांचा समावेश करण्यात आला आहे.कोकण भवनात उभारण्यात आलेला हा सेल्फी पाईंट आकर्षणाचा केंद्र बिंदू बनला असून येणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उत्साहाने या सेल्फी पॉईंट सोबत आपले सेल्फी घेत आहेत.
सेवा पंधरवडा सेल्फी पॉईंटचे उद्घाटन, कोकण विभागीय कार्यालयाचा उपक्रम
By कमलाकर कांबळे | Published: September 19, 2022 6:00 PM