नवी मुंबई : महापालिकेच्या सहा वर्षे रखडलेल्या ऐरोली, नेरूळ व बेलापूर रूग्णालयांचे उद्घाटन १ मेला करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे यावेळीतरी रूग्णालय सुरू होणार की पुन्हा पुढचा मुहूर्त शोधला जाणार असा प्रश्न शहरवासी विचारू लागले आहेत. नवी मुंबई महापालिका रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. पहिल्या वर्षी तीस कोटी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महापालिकेचा अर्थसंकल्प २ हजार २४ कोटींवर गेला आहे. पालिकेने स्वत:च्या मालकीचे धरण विकत घेतले. अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र व इतर प्रकल्पांवर करोडो रूपये खर्च केले. आरोग्य सेवेवरही प्रत्येक वर्षी १०० कोटींपेक्षा जास्त खर्च केला जात आहे. परंतु यानंतरही शहरवासीयांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा महापालिकेला देता आलेल्या नाहीत. २००९ मध्ये महापालिकेने ऐरोली व नेरूळ माता बाल रूग्णालयाच्या जागेवर १०० बेडचे सुसज्ज रूग्णालय व बेलापूरमध्ये ५० बेडचे माताबाल रूग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीपूर्वी तीनही रूग्णालयांच्या इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात आले. २०१० च्या अखेरपर्यंत तीनही रूग्णालये सुरू होतील असे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात अद्याप काम पूर्ण होवू शकलेले नाही. दोन वर्षांपूर्वी विधानसभा व लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच घाई - गडबडीमध्ये तीनही रूग्णालयांमध्ये ओपीडी सुरू करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात रूग्णालय सुरू करण्यात यश आले नाही. इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आल्यानंतर मेडिकल गॅसची लाइन टाकण्याचा विसर पडल्याचा साक्षात्कार झाला. यामुळे पुन्हा वर्षभर उद्घाटन लांबणीवर गेले. तीनही रूग्णालयांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय साहित्य व फर्निचरचे काम वेळेत न झाल्यामुळे उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडू लागला आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने होत असलेली टीका व शहरवासीयांमधील असंतोषामुळे पालिकेने ऐरोली व नेरूळमध्ये माताबाल रूग्णालय सुरू केले आहे. १ मे रोजी तीनही रूग्णालयांचे कामकाज सुरू करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कर्मचारी भरती व इतर कामेही मार्गी लावण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
शहरातील तीन रूग्णालयांच्या उद्घाटनांना मुहूर्त महाराष्ट्र दिनाचा
By admin | Published: April 07, 2016 1:31 AM