नवी मुंबईत कोरोना काळात झाले श्वानदंशाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्मे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:07 AM2021-02-01T02:07:41+5:302021-02-01T02:08:15+5:30
Navi Mumbai News : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहरात श्वानदंशाचे प्रमाणही घटले आहे. डिसेंबरपर्यंत ४,८८३ जणांना श्वान दंश झाला असून, हे प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्मे आहे. सहा वर्षांत जवळपास ७० हजार नागरिकांवर श्वानांनी हल्ला केल्याची नोंद झाली आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहरात श्वानदंशाचे प्रमाणही घटले आहे. डिसेंबरपर्यंत ४,८८३ जणांना श्वान दंश झाला असून, हे प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्मे आहे. सहा वर्षांत जवळपास ७० हजार नागरिकांवर श्वानांनी हल्ला केल्याची नोंद झाली आहे.
मुंबई, ठाणे प्रमाणे नवी मुंबईमधील नागरिकांनाही भटक्या श्वानांच्या उपद्रवास सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेने श्वान नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया वाढविल्या आहेत. यामुळे भटक्या श्वानांची वाढ रोखण्यात यश आले असले तरी श्वानदंशाच्या घटना कमी होत नव्हत्या. प्रत्येक वर्षी दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांना श्वानांनी चावल्याची नोंद होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून श्वानदंशाचे प्रमाणही कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबरपर्यंत ४८८३ नागरिकांना श्वानदंश झाल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी ही संख्या १०४८२ होती. एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाला. नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावरही निर्बंध आले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही रात्रीच्या फिरण्यावर निर्बंध कायम राहिले आहेत. यामुळे श्वान चावल्याच्या घटना कमी झाल्याचे बोलले जात आहे.सहा वर्षांत ७० हजार जणांना श्वानांनी चावले आहे. सर्वाधिक १४५५६ घटना २०१६ - १७ या वर्षात झाल्या आहेत.
२५ हजार श्वानांचे निर्बीजीकरण
महानगरपालिकेने २०१४ पासून आतापर्यंत तब्बल २५१३१ श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली आहे. २२३९७ जणांवर उपचार केले आहेत. निर्बीजीकरण व उपचारावर सहा वर्षांत ७ कोटी ६६ लाख ५९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहरातील जवळपास ९० टक्के श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झाली आहे.
वर्षनिहाय घटना पुढीलप्रमाणे
वर्ष श्वानदंश
२०१५ - १६ १३,९२१
२०१६ - १७ १४,५४६
२०१७ - १८ १३,७८३
२०१८ - १९ १२,२९५
२०१९ - २० १०,४८२
२०२० - २१ ४,८८३
अनेक रुग्ण मानखुर्द, गोवंडीचे
श्वान दंशाच्या घटनांमध्ये अनेक रुग्ण हे मानखुर्द, गोवंडी व इतर ठिकाणचे असल्याचेही निदर्शनास आले आहे. मनपा बाहेरचे रुग्णही उपचारासाठी येथे येतात. यामुळे पालिका प्रशासनाने श्वान दंशाच्या शहरातील घटना किती व शहराबाहेरील किती याची माहिती तपासण्यासही सुरुवात केली आहे.