गणेश विसर्जनासाठी गेलेले दोघे गेले वाहून, पनवेल तालुक्यातील कोप्रोलीमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 02:30 PM2022-09-07T14:30:00+5:302022-09-07T14:30:52+5:30
कोप्रोलीतील कमांडर सोसायटी येथील सात ते आठ जण गणपती विसर्जनासाठी सोमवारी रात्री भोरदार (गाढी) नदीत गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक वाहून जात असल्याचा दिसून आले.
नवीन पनवेल : पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथील नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण वाहून गेल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली. अग्निशमन दल, पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने रात्री त्यांचा शोध घेण्यात आला. मंगळवारी पुन्हा सकाळपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सकाळी ११ च्या सुमारास एकाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्याचा मृतदेह सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास सापडला. विक्रम जमादार (२१), शेखर माणिक जमादार (२०) अशी दोघांची नावे आहेत.
कोप्रोलीतील कमांडर सोसायटी येथील सात ते आठ जण गणपती विसर्जनासाठी सोमवारी रात्री भोरदार (गाढी) नदीत गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक वाहून जात असल्याचा दिसून आले. त्याला वाचविण्यासाठी एक जण गेला असता तो वाहून गेला. त्यानंतर, दुसरा एक तरुण बॅटरी घेऊन धावत आला, तोही वाहत गेला. त्याच्या पाठोपाठ आलेले अन्य तिघेही वाहून जाऊ लागले. रात्रीची वेळ असल्याने यातील दोघे जण बेपत्ता झाले आहेत, तर चौघे जण बाहेर निघाले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, अग्निशमन दल, ग्रामस्थ हजर होते.