मयूर तांबडे पनवेल : पंतप्रधान मातृत्व वंदना योजना व जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यातील गर्भवती महिलांसाठी आधार कार्ड नोंदणी शिबिर २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात झालेल्या या आधार कार्ड शिबिरासाठी शेकडो गर्भवती महिला उपस्थित होत्या. मात्र, दुपारीच आधार कार्डची मशिन बंद झाल्यामुळे महिलांना निराश होऊन घरी परत जावे लागते.पनवेल तालुक्यात हजारो नागरिकांची अद्यापही आधार कार्ड नोंदणी करणे बाकी आहे. महिलांचीही आधार कार्ड नोंदणी बाकी आहे. पंचायत समितीच्या कार्यालयात २२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत गर्भवती महिलांना मोफत आधार कार्ड काढून दिले जाणार होते. यासाठी तालुक्यातील १२७ गर्भवती महिला उपस्थित राहिल्या होत्या. महिलांच्या मोफत आधार कार्ड नोंदणीसाठी दोन मशिन उपलब्ध करण्यात येणार होत्या. प्रत्यक्षात मात्र एकच मशिन आणण्यात आली. त्यातच २५ ते २७ महिलांची आधार नोंदणी झाल्यानंतर मशिन अचानक बंद पडली. ती पुन्हा सुरूच झाली नसल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे महिलांना आधारविनाच परत घरी जावे लागले. तालुक्यातील गावागावांतून गर्भवती महिला पंचायत समितीच्या कार्यालयात आधार नोंदणीसाठी आल्या होत्या. काही महिला भाड्याने वाहन करून नोंदणीसाठी आल्या होत्या. मात्र, त्यांनाही निराश होऊन परतावे लागले. नागरिकांना सर्वमान्य ओळख मिळवून देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन नंबर’ अर्थात आधार कार्ड हा महत्त्वाकांक्षी नोंदणी कार्यक्र म पनवेलमध्ये सुरू करण्यात आला होता. मात्र, बहुतांशी ठिकाणी नोंदणी बंद झाल्याचे दिसून येत आहे. शहरी व ग्रामीण भागात सद्यस्थितीत आधार कार्डची नोंदणी करणारे केंद्र नसल्यामुळे ज्यांची नोंदणी बाकी आहे, त्यांची स्थिती वाºयावर सोडून दिल्याप्रमाणे झाली आहे. बँकेत खाते उघडताना, गॅस सबसिडी मिळविण्यासाठी, पारपत्र मिळविताना, वाहनचालक परवाना मिळविताना अथवा तत्सम कामे करताना प्रत्येक वेळी स्वत:ची ओळख पटविण्यासाठी आधार कार्डाची गरज लागते. पंचायत समितीच्या कार्यालयात शुक्र वारी छोटेखानी कार्यक्र माचे आयोजन करत गर्भवती महिलांना आधार कार्ड प्रक्रि येत सहभागी होण्यासाठी बोलविण्यात आले होते. या आधार नोंदणी कार्यक्र माला गर्भवती महिलांनी चांगला प्रतिसाद दिला होता; परंतु ऐन वेळी मशिनच बंद पडल्याने उपस्थित महिलांची पुरती निराशा झाली.>तहसील कार्यालयात जाऊन दुसरी मशिन आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मशिन आलीच नाही. ३० महिलांची नोंदणी झाल्यानंतर मशिनच बंद पडली. पुन्हा एकदा आधार कार्ड नोंदणी घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.- नागनाथ येमपल्ले,तालुका आरोग्य अधिकारी,पंचायत समिती
आधार मशिन बंद पडल्याने गर्भवतींची झाली गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 2:46 AM