सीवूडमधील कामामुळे गैरसोय
By Admin | Published: April 11, 2016 01:41 AM2016-04-11T01:41:33+5:302016-04-11T01:41:33+5:30
सीवूड रेल्वे स्थानकात फलाटाच्या सुरू असलेल्या कामामुळे प्रवाशांची त्या ठिकाणची पाऊलवाट बंद झाली आहे. यामुळे पश्चिमेकडील चाकरमान्यांना स्थानकात जाण्यासाठी पायपीट करावी लागत
नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्थानकात फलाटाच्या सुरू असलेल्या कामामुळे प्रवाशांची त्या ठिकाणची पाऊलवाट बंद झाली आहे. यामुळे पश्चिमेकडील चाकरमान्यांना स्थानकात जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामुळे घाईमध्ये असलेल्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पर्यायी सोय करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
सीवूड रेल्वे स्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे सीवूड - दारावे परिसरातील प्रवाशांची तूर्तास गैरसोय होत आहे. बांधकाम सुरू असल्यामुळे स्थानकात जाण्यासाठी पर्यायी उपलब्ध केलेले मार्ग प्रवाशांच्या गैरसोयीचे आहेत. यामुळे सीवूड येथील पुलाखाली उपलब्ध जागेचा वापर स्थानकात जाण्यासाठी होत आहे.
परंतु नुकतेच जुन्या रेल्वेरुळाच्या कामाला सुरुवात झाल्याने प्रवाशांचा पुलाखालील हा पर्यायी मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे सीवूड पश्चिमेकडील प्रवाशांना सुमारे एक किलोमीटरची पायपीट करीत स्थानकात जावे लागत आहे.
यामुळे चाकरमान्यांची गैरसोय होत असल्याचे शिवसेनेचे शाखाप्रमुख समीर बागवान यांचे म्हणणे आहे. याकरिता त्यांनी सदर ठिकाणी सुरू असलेले काम तूर्तास बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. अगोदर प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या. त्यानंतरच रुळाच्या कामाला सुरुवात करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी सिडको प्रशासनाला दिले आहे. (प्रतिनिधी)