नवी मुंबई : महापालिका रूग्णालयामध्ये रूग्णांच्या नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्थाच नाही. यामुळे नागरिकांना जमीनीवर बसावे लागत आहे. पुरेशी व्यवस्था करण्याची मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने त्रिस्तरीय आरोग्य यंत्रणा राबविली आहे. यामध्ये नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रूग्णालय व प्रथम संदर्भ रूग्णालयाचा समावेश आहे. महापालिकेची बेलापू, नेरूळ व ऐरोलीमधील रूग्णालय पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. तुर्भे व कोपरखैरणे माताबाल रूग्णालय बंदच आहेत. यामुळे रूग्णांना वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयावर अवलंबून रहावे लागत आहे. वाशी रूग्णालयामध्ये रूग्णांची संख्या वाढत आहे. बेलापूर ते दिघा परिसरातील सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी रूग्णालयामध्ये येत आहे. रूग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकही मोठ्या संख्येने येत असतात. रूग्णासोबतही एक किंवा दोन नातेवाईक कायमस्वरूपी थांबलेले असतात. रूग्णालयामध्ये नातेवाईकांसाठी प्रतिक्षाकक्षच उपलब्ध नाही. यामुळे नातेवाईकांना वार्डच्या बाहेर बसून रहावे लागत आहे. याठिकाणी बैठक व्यवस्था असावी अशी मागणी वारंवार नागरिकांनी केली आहे. परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्येक मजल्यावर गरजेप्रमाणे खुर्च्या उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रूग्णालयामध्ये जमीनीवर बसलेले नागरिक पाहून सामाजीक कार्यकर्त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय व इतर खाजगी रूग्णालयामध्येही बैठक पुरेशी व्यवस्था आहे. परंतु महापालिकेच्या रूग्णालयामध्ये आवश्कता असूनही रूग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतिक्षा कक्ष व गरजेप्रमाणे बैठक व्यवस्था नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनीही रूग्णांची गैरसोय दूर व्हावी अशी मागणी केली आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी मुख्य आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांच्याशी संपर्क साधला परंतु होवू शकला नाही.दिघा ते बेलापूरपर्यंतचे नागरिक उपचारासाठी महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात येत असतात. रुग्णालयातील वार्डच्या बाहेर बैठक व्यवस्था नसल्यामुळे रुग्णासोबत असलेल्या नातेवाइकांना जमिनीवर बसावे लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रत्येक वॉर्डच्या बाहेर पुरेशी बैठक व्यवस्था निर्माण करावी. - मंदाकिनी रमाकांत म्हात्रे, उपमहापौर