अंकुश मोरे / वावोशीमुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, एनएच ०४ राष्ट्रीय महामार्ग, लोकल रेल्वे लाइन, मोठी औद्योगिक वसाहत व दीड लाखांपर्यंत पोहोचलेली शहराची लोकसंख्या अशा स्थितीत खोपोली नगरपालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आपत्कालीन स्थिती व दैनंदिन उपचारासाठी महत्त्वाची भूमिका वठवीत आले आहे. मात्र, मागील काही महिन्यांत अपूर्ण डॉक्टर, नादुरुस्त उपचार साहित्य अशा गैरसोयीने हे रुग्णालय खिळखिळे झाले आहे. दाखल केलेल्या रु ग्णावर वेळेवर व्यवस्थित उपचार होईलच, असा विश्वास नागरिकांना राहिला नसल्याने आर्थिक क्षमता नसतानाही अनेक रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. खोपोली नगरपालिका रुग्णालयात एक मुख्य वैद्यकीय अधिकारी चार फूल टाइम डॉक्टर व चार मानधनावर पार्ट टाइम डॉक्टर अशा जागा मंजूर आहेत. मागील अनेक महिन्यांपासून मात्र या रु ग्णालयात एक वैद्यकीय अधिकारी व दोनच फूल टाइम डॉक्टर कामकाज करीत आहेत. मानधनावर नियुक्त चार मंजूर डॉक्टरांपैकी दोन डॉक्टर नियुक्त असले, तरी तेही अनेक दिवसांपासून दीर्घ रजेवर आहेत. परिचारिका, वार्डबॉय, साफसफाई कर्मचारी अशा सर्व ठिकाणी मंजूर पदापेक्षा पन्नास टक्केपेक्षा कमी कर्मचारी या रु ग्णालयात कार्यरत असल्याने याचा मोठा ताण डॉक्टर व कर्मचारी वर्गावर पडत आहे. या रु ग्णालयात एक्सरे मशिन, विविध तपासणीसाठीची सामग्री आहे. मात्र, देखभालीमधील हलगर्जीपणा व वेळीच दुरुस्ती होत नसल्याने ही सामग्री गरजेच्या वेळी कामाला येईलच याची खात्री रुग्णालयातील कर्मचारीही देत नसल्याची स्थिती आहे. रु ग्णालयाच्या छताची, परिसर साफसफाईची अवस्थाही भयानक असल्याने या समस्यांचा थेट परिणाम रुग्णालयातील सेवेवर पडत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांवर वेळेवर उपचार होऊ शकत नाहीत, म्हणून त्यांना नाइलाजाने खासगी दवाखान्यात दाखल करावे लागत आहे.सर्वसाधारण सभेत मांडणार विषयरु ग्णालयातील समस्या व गैरसोयीबाबत नगरसेवक कुलदीपक शेंडे, किशोर पानसरे, नगरसेविका माधवी रिठे यांच्याशी चर्चा केली असता, रु ग्णालयात डॉक्टर संख्या कमी आहे हे त्यांनी मान्य केले. मात्र, सर्व शिफ्ट मिळून फक्त दोनच डॉक्टर कार्यरत आहेत ही बाब गंभीर असल्याचे सांगून, याबाबत आम्ही नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना तत्काळ सुधारणा करण्याची विंनती करणार. मात्र, यातून काही सुधारणा न झाल्यास येणाऱ्या सर्वसाधारण सभेत या समस्यांबाबत जाब विचारला जाणार, असे त्यांनी स्पष्ट केले.नाइलाज आहे, म्हणून आहे त्या स्थितीत रु ग्णांना सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. पद नियुक्ती, साहित्य खरेदी, त्याची दुरुस्ती या बाबी प्रशासकीय असल्याने आम्ही फक्त मागणी करू शकतोे. - संगीता वानखेडे, मुख्य वैद्यकीय अधिकारीसर्वसामान्य नागरिकांना काहीही देणे-घेणे नसलेल्या विषयांवर अनेक तास चर्चा करणाऱ्या नगरसेवक नागरिकांच्या मूलभूत सेवा देण्यात निर्माण होत असलेल्या अडचणींबाबत चर्चा करण्यास वेळ नाही, हे चित्र सर्वसामान्य नागरिकाला संताप आणणारे आहे. नगरपालिका रुग्णालयात सर्व मंजूर डॉक्टरांची व इतर पदे तत्काळ भरण्याची गरज आहे. कागदावर १७६ कोटींचा अर्थसंकल्प, मूलभूत सेवा देण्यासाठी मात्र निधीची अडचण मग एवढा मोठा निधी जातो कुठे? हा मुख्य प्रश्न आहे.- मधुकर दळवी, माजी आरोग्य सभापती
नगरपालिका रुग्णालयात गैरसोय
By admin | Published: March 31, 2017 6:19 AM