मोडक्या खेळण्यांमुळे मुलांसाठी उद्याने गैरसोयीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:55 AM2018-12-12T00:55:54+5:302018-12-12T00:56:11+5:30
तुटलेल्या साहित्यांमुळे अपघाताची शक्यता; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी
नवी मुंबई : पालिकेने विकसित केलेल्या उद्यानांमधील खेळण्यांची डागडुजीअभावी मोडतोड झालेली आहे. यामुळे त्या ठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना दुखापत होण्याची शक्यता निर्माण होत आहे. अशा मोडक्या खेळण्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.
पालिकेने प्रत्येक नोडमध्ये विकसित केलेल्या छोट्या-मोठ्या उद्यानांमुळे उद्यानांचे शहर म्हणून देखील नवी मुंबईची ओळख होते. त्यापैकी अनेक उद्यानात लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी बसवण्यात आली आहेत. यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळ त्याठिकाणी लहान मुलांची खेळासाठी गर्दी जमलेली असते; परंतु डागडुजीअभावी बहुतांश ठिकाणच्या उद्यानातील खेळण्यांची मोडतोड झालेली आहे. त्यामुळे मोडलेल्या खेळण्यांच्या धातूचे भाग चोरीला गेल्याचेही पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी घसरगुंडीच्या वरच्या टोकावर मुलांच्या सुरक्षेसाठी असलेले भाग तुटलेले आहेत, तर झोके एका बाजूला झुकले आहेत.
उद्यानांमधील लहान मुलांसाठी असलेल्या या खेळण्यांचा वापर बहुतेक वेळा काही टवाळ मुलांकडून मस्ती करण्यासाठी होत आहे. यामुळेही खेळण्यांची मोडतोड होत असल्याचाही पालकांचा आरोप आहे. यामुळे प्रत्येक उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक नेमण्याचीही मागणी होत आहे; परंतु प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने बहुतांश उद्यानातील मोडकी खेळणी जशीच्या तशी आहेत. लहान मुलांकडून त्यांचा वापर खेळण्यासाठी होत असल्याने एखाद्यास दुखापत होण्याची देखील शक्यता निर्माण होत आहे. याचे गांभीर्य स्थानिक लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकारीदेखील घेत नसल्याचाही संताप पालकांकडून व्यक्त होत आहे.