अनिकेत घमंडी, डोंबिवलीमध्य रेल्वेच्या बहुतांशी सर्वच स्थानकांमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे, परंतु मुंब्रा स्थानकातील गर्दीमुळे प्रवाशांना कल्याण दिशेने आधीच भरून आलेल्या गाड्यांमध्ये प्रवेश करता येत नसल्याने लटकून, विरुद्ध दिशेने गाडीत प्रवेश करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. ही समस्या दिवा, मुंब्रा, कळवा या तीनही स्थानकांतील प्रवाशांना भेडसावत असल्याने सकाळच्या वेळेत किमान चार गाड्या सीएसटीच्या दिशेने दिव्यातून सोडण्याची त्यांची मागणी आहे.या तीनही स्थानकांमध्ये जलद मार्गाचा ट्रॅक असला तरीही या ठिकाणी लोकल थांबा नसल्याने सर्व भार हा धीम्या मार्गावरील फलाटांमध्येच येतो. तुलनेने डोंबिवलीसह कल्याण, ठाणे या स्थानकांंमध्येही गर्दी असली तरीही ती विभागली जाते, त्यामुळे त्या ठिकाणी गर्दीची समस्या फारशा प्रमाणात भेडसावत नाही. तसेच त्या स्थानकांमधून सुटणाऱ्या लोकलचीही सुविधा असल्याने त्या स्थानकांमधील प्रवाशांना तुलनेने दिलासा आहे. ही व्यथा असली तरी रेल्वे प्रशासन या मागणीकडे काणाडोळा का करत आहे, अशी तक्रार या स्थानकांंधील प्रवासी करतात. गर्दीच्या वेळेस कळव्याच्या दिशेला गाडी धावतांना रेतीबंदर परिसरात असलेल्या वळणामुळे तोल जाऊन अपघात घडतात. मुंब्रा येथे पूर्वेला वस्ती आहे, तेथे जाण्यासाठी अथवा तेथून ट्रॅक क्रॉस केल्यावर हायवे (द्रुतगती मार्ग) ला सहज जाता येते. अशा गडबडीत लोकलची धडक बसून अपघाताच्या घटना घडतात.१स्थानकात दोन फलाट आहेत. दोन पादचारी पूल आहेत. तेथे भिकाऱ्यांसह गर्दुल्ल्यांचा मुक्त संचार असतो. त्याचाही त्रास प्रवाशांना होतो. तो टाळण्यासाठी काही प्रवासी ट्रॅक क्रॉस करत फलाट गाठतात. त्यामुळेही त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. या ठिकाणी रेल्वे पोलीस फोर्स, लोहमार्ग पोलीस यांची चौकी आहे, परंतु त्यांचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळेच या ठिकाणी विरुद्ध दिशेला गाडी येण्याआधीच ट्रॅकमध्ये उभे राहून दुसऱ्या दरवाजानेही गाडीत प्रवेश करणे, लोकलच्या टपावर बसून प्रवास करणे, खिडकीला लटकणे, यासारखी ही दृश्ये नित्याची झाली आहेत. २या ठिकाणी स्वच्छतेचाही गंभीर प्रश्न आहे. सफाई कामगार कमी पडत आहेत. परिणामी, स्थानकाला बकाली येते. ठिकठिकाणी थुंकलेले, पानाच्या पिचकाऱ्यांनी फलाटांच्या भिंती रंगलेल्या दिसून येतात. ३स्थानकातून दिवसाला ८०-९० हजार प्रवासी प्रवास करतात. साधारणत: २४ हजार तिकिटांची विक्री होते, त्यातून दिवसाला १० ते ११ लाखांची उलाढाल होते. येथे सात मंंजूर खिडक्या असून सध्या मनुष्यबळाअभावी अवघ्या तीन उघड्या असतात. त्यामुळे तिकीट खिकड्यांभोवती प्रवाशांची प्रचंड रांग दिसून येते. आरक्षण तिकीट केंद्राची सुविधाही येथे आहे. तेथील दोन खिडक्यांच्या माध्यमातून सुमारे दोन लाखांची उलाढाल होते. ४या ठिकाणी अवघे एक स्वच्छतागृह होते, ते देखील गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होते. अनेक प्रवासी फलाटांच्या कोपऱ्यांमध्येच आडोशाला शौचाला जातात, त्यामुळेही फलाटांत प्रचंड दुर्गंधी पसरते. जे एक स्वच्छतागृह फलाट क्र. २ वर आहे, त्या ठिकाणची डागडुजी होणे आवश्यक आहे. तसेच पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने ते बंद ठेवण्यात आले आहे. पूर्वी त्या ठिकाणी स्थानकालगतच्या एका विहिरीतून पाणी मिळायचे, परंतु अतिक्रमणाच्या कारवाईत त्या विहिरीचे नुकसान झाले आणि तेथून पाणी मिळणे बंद झाले. आता येथे बोअरिंगची सुविधा करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे, पण त्यास गती मिळालेली नाही. या स्थानकातून लाखांच्या घरात प्रवासी प्रवास करतात. त्या प्रवाशांना विशेषत: स. ७.३० ते १० या गर्दीच्या वेळेत गाडीत प्रवेश करता येत नाही. त्यासाठी त्यांना सकाळच्या वेळेत येथून गाड्या सुटणे आवश्यक आहे. रेल्वेला तांत्रिक अडचणींमुळे येथून लोकल सोडणे जमत नाही हे मान्य, परंतु त्यांनी कल्याण-डोंबिवली येथून रिकामा डबा आणावा, तो दिव्यातून अथवा मुंब्रा येथून सीएसटीसाठी सोडावा आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी. अपघातांवरही त्यामुळे नियंत्रण मिळेल. - नाझिमा सय्यद, उपाध्यक्षा, मुंबई रेल्वे प्रवासी संस्था आणि उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था
लोंढ्यांमुळे मुंब्य्रातील अपघातांमध्ये वाढ!
By admin | Published: November 28, 2015 1:08 AM