अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात तीन पट वाढ; कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 02:01 AM2018-09-04T02:01:18+5:302018-09-04T02:01:26+5:30
महानगरपालिका अग्निशमन दलामधील कर्मचा-यांना जादा कामासाठी अत्यंत कमी मोबदला मिळत होता. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी कर्मचा-यांच्या अतिकालिक भत्त्यामध्ये तीन पट वाढ केली आहे.
नवी मुंबई : महानगरपालिका अग्निशमन दलामधील कर्मचा-यांना जादा कामासाठी अत्यंत कमी मोबदला मिळत होता. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी कर्मचाºयांच्या अतिकालिक भत्त्यामध्ये तीन पट वाढ केली आहे. कर्मचारी भरतीची प्रक्रियाही ५ सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे. प्रलंबित प्रश्न सुटल्यामुळे कर्मचाºयांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत.
शहरातील १४ लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त १३९ अग्निशमन कर्मचारी व अधिकाºयांवर अवलंबून आहे. कमी मनुष्यबळ असतानाही अग्निशमन जवान जीव धोक्यात घालून आग विझविण्याचे व प्रत्येक आपत्तीमध्ये शहरवासीयांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. शहरात अडकलेला पक्षी, मानवी वस्तीमध्ये शिरलेला साप, गणेशोत्सवापासून सर्व आपत्ती ओढविण्याच्या ठिकाणी अग्निशमन जवानांना तैनात रहावे लागते. कमी मनुष्यबळ असल्यामुळे अनेक कर्मचाºयांना ८ ऐवजी १६ तास कर्तव्यावर रहावे लागते. जवान विनातक्रार कर्तव्य बजावत आहेत. परंतु या जादा कामासाठी अत्यंत तुटपुंजा मोबदला दिला जात होता. आठ तास जादा काम केल्यानंतर फक्त १९० रुपये देण्यात येतात. सिडको, एमआयडीसी, नाशिक व इतर महापालिकांमध्ये मात्र यापेक्षा कित्येक पट जादा मोबदला दिला जात होता. अतिकालिक भत्त्याच्या प्रश्नावर ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर आयुक्त रामास्वामी एन. यांनी तत्काळ दखल घेवून तब्बल तीनपट
मोबदला वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
अग्निशमन दलामध्ये कार्यरत असलेल्या सहायक केंद्र अधिकाºयांना यापूर्वी प्रत्येक तासाला ३८ रुपये अतिकालिक भत्ता दिला जात होता, यामध्ये वाढ करून तो १३६ रुपये करण्यात आला आहे. अग्निशमन प्रणेताला ३३ वरून ९३ रुपये, चालक, आॅपरेटरला ३० वरून ११२ व अग्निशामकांना २४ वरून ७१ रुपये अतिकालिक भत्ता करण्यात आला आहे. तिप्पटपेक्षा जास्त वाढ केल्यामुळे अग्निशमन कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये वाशी, ऐरोली, नेरूळ व सीबीडी अशी चार केंद्रे आहेत. कोपरखैरणेमध्ये नवीन केंद्र सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये नवीन २६० कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यासाठी ५ सप्टेंबरला जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे
आयुक्तांचे आभार
महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाºयांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यावरही विशेष लक्ष दिले आहे. माध्यमिक शिक्षक, बालवाडी शिक्षिका, मदतनीस यांना वेतनवाढ दिली आहे. कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू केले असून फरकाची रक्कमही दिली आहे. यानंतर अग्निशमन कर्मचाºयांचा प्रश्नही सोडविला असून कर्मचाºयांनी आयुक्तांचे विशेष आभार मानले आहेत.
अग्निशमन दल बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अतिकालिक भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. नवीन कर्मचारी भरती सुरू केली जात आहे. या विभागाशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावले जात आहेत.
- रामास्वामी एन.,
आयुक्त, महापालिका