उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 01:49 AM2019-05-04T01:49:35+5:302019-05-04T01:49:59+5:30
बंद घरांवर लक्ष : वाहनचोरीचे सत्रही सुरू; नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन
नवी मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे हजारो नागरिक मूळ गावी किंवा पर्यटनासाठी बाहेर जाऊ लागले आहेत. याचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. घरफोडी व वाहनचोरीच्या घटना वाढू लागल्या असून नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरणमधील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. लग्न, गावाकडील यात्रा, निवडणूक व इतर कारणांमुळे हजारो चाकरमानी गावी गेले आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठीही अनेक जण बाहेर जात आहेत. प्रत्येक वर्षी याच कालावधीमध्ये चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. चोरट्यांनी बंद घरांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. गत आठवड्यामध्ये नेरुळ गावामध्ये एकाच इमारतीमधील पाच घरांचे टाळे तोडून दागिने व रोख रकमेची चोरी करण्यात आली होती. अशाप्रकारच्या अनेक घटना शहरात घडू लागल्या आहेत. ज्या घराचा दरवाजा दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बंद आहे, अशा घरांचे टाळे तोडून आतमधील किमती साहित्य चोरून नेले जात आहे. रोडवर उभ्या केलेल्या वाहनांचीही चोरी केली जात आहे. जी वाहने दोन दिवस किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस एकाच ठिकाणी उभी आहेत ती चोरी करू लागली आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाताना नागरिकही पुरेशी काळजी घेत नाहीत. सुरक्षारक्षक असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बंद घरांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. गावी जाताना नागरिकांनी शेजाऱ्यांना माहिती देणेही आवश्यक आहे. वाहने शक्यतो रोडवर उभी करू नयेत. वाहनतळावर सुरक्षितपणे वाहने उभी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पण नागरिक सुरक्षेविषयी उदासीनता दाखवत असल्यामुळे चोरट्यांना संधी मिळत आहे. अनेक नागरिकांच्या घरांची कडी, कोयंडी चांगल्या दर्जाचे नसतात. दोन मिनिटात चोरटे दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करत आहेत. रोडवर उभ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणतीच सुरक्षेची उपकरणे वापरली जात नाहीत. यामुळे वाहनांची चोरी होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पोलिसांनी उन्हाळ्यासाठी शहरामधील गस्त वाढविली आहे.
नागरिकांकडून सुट्ट्यांमध्ये घर बंद करून बाहेर जाताना घरातील ऐवज सेफ्टी लॉकरमध्ये अथवा बँकेत ठेवला जाणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता अनेक जण महागडे दागिने घरात ठेवून सुट्टीवर जातात. अशावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या गुन्हेगाराकडून घरफोडीची शक्यता असते.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सुरक्षेची अनेक उपकरणे बाजारात आहेत. त्यामध्ये सीसीटीव्हीसह सेन्सर अलार्मचाही समावेश आहे. त्याद्वारे घर बंद असताना आतमध्ये कसलीही संशयास्पद हालचाल झाल्यास अलार्म वाजून मोबाइलवर देखील त्याची माहिती मिळू शकते.
मागील काही दिवसात पोलिसांनी अनेक सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात घरफोडी व चोरी करणाºया गुन्हेगारांचाही समावेश आहे. मात्र गुन्हेगारांवर पोलिसांकडून कारवाया होत असल्या तरीही नागरिकांकडून देखील स्वत:च्या ऐवजाची काळजी घेतली जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
सुट्ट्यांमध्ये घराबाहेर जाताना नागरिकांकडून पुरेशी खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. घराला सेफ्टी डोअर तसेच सीसीटीव्ही असल्यास चोरीला आळा बसू शकतो. तसेच इमारतीच्या सुरक्षारक्षकाने अज्ञात व्यक्ती, सेल्समन यांना आतमध्ये प्रवेश देणे टाळले पाहिजे. - डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उपआयुक्त