नवी मुंबई : पंजाबमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशात खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनीही खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. यासंबंधी वरिष्ठ स्तरावर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दहशतवादाचा खात्मा करण्यास नवी मुंबई पोलीस सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.पठाणकोटमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यात मुंबई अथवा लगतच्या शहरांना दहशतवाद्यांकडून लक्ष केले जाऊ शकते. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. याकरिता नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबईला लागूनच असलेल्या नवी मुंबईलादेखील दहशतवाद्यांकडून लक्ष केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे दहशतवाद्यांकडून तसा प्रयत्न झाल्यास तो हानून पाडण्याच्या अनुषंगाने गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नवी मुंबईचा सागरीकिनारा, महत्त्वाचे रस्ते यांचा वापर दहशतवाद्यांकडून होऊ शकतो याचीही खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. त्याकरिता महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तर गर्दीच्या ठिकाणी वावरणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या हालचालींवरही नजर ठेवण्यासाठी साध्या वेषातील पोलीस कार्यरत आहेत. त्याशिवाय पार्किंगच्या ठिकाणी उभ्या असलेल्या संशयास्पद वाहनांची पाहणीदेखील केली जात आहे. तर मॉल, थिएटर, शाळा- महाविद्यालये, रेल्वे स्थानके, बसथांबे अशा महत्त्वाच्या ठिकाणांवर देखील पोलिसांची करडी नजर राहणार आहे. याच अनुषंगाने कोपरखैरणे पोलिसांनी शुक्रवारी गर्दीच्या दोन ठिकाणी सुरक्षेची चाचपणी घेऊन शाळांच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक सूचना केल्या.कोपरखैरणे पोलिसांनी हद्दीतल्या २७ शाळांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत शाळा किंवा महाविद्यालयाभोवतीच्या सुरक्षा भिंतीची उंची वाढवून त्यावर तारेचे कुंपण लावण्याच्या सूचना वरिष्ठ निरीक्षक सतीष गायकवाड यांनी केल्या. (प्रतिनिधी)
शहरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ
By admin | Published: January 23, 2016 3:14 AM