नशेच्या बाजाराचा आलेख वाढतावाढे
By admin | Published: June 25, 2017 03:58 AM2017-06-25T03:58:30+5:302017-06-25T03:58:30+5:30
सध्या कुणी योग संस्कृतीच्या मागे लागले आहे, तर कुणी भोग संस्कृतीच्या. डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया
- नारायण जाधव
सध्या कुणी योग संस्कृतीच्या मागे लागले आहे, तर कुणी भोग संस्कृतीच्या. डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया अन्् स्टार्ट अप इंडियाच्या नादात राज्यकर्ते महानगरांमध्ये तरुणाईत फोफावत चाललेल्या रेव्ह पार्टीच्या नावाखालील अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. तरुणाईच नव्हे, एमडी सारख्या नशिल्या पदार्थांच्या आहारी शालेय विद्यार्थीही गेले आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या बाहेरच्या खाद्यपदार्थ आणि आईस्क्रिम विके्रत्यांच्या माध्यमातून ही साखळी बालवयातच लहानग्यांना नशेच्या खाईत ढकलत आहे. यामुळेच की काय मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईच नव्हे तर नाशिक, सोलापूर सारख्या महानगरांतही गेल्या काही वर्षांत अमली पदार्थ विक्रीच्या घटनांत वाढ झाल्याचे पोलिसांनी विविध ठिकाणी पकडलेल्या आरोपींच्या संख्येवरून सिद्ध होत आहे.
जागतिक स्तरावर २६ जून हा दिवस अंमली पदार्थविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातही त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा तर राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने पहिल्यांदाच परिपत्रक काढून अंमली पदार्थांपासून तरुणाईने दूर राहावे, यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक संयुक्त राष्ट्राने १९८७ पासून हा विषय गंभीर आणि महत्त्वाचा मानला आहे. भारतात तर एनडीपीएस अर्थात नार्कोटिक ड्रग्ज अॅन्ड सायकोट्रोपिक सबन्टन्स अॅक्ट १९८५ अंमलात आहे.
या कायद्यानुसार अंमली पदार्थांचे सेवन करणे, ते बाळगणे, त्यांची विक्री आणि वाहतूक करणे तसेच त्यांच्या उत्पादनास मनाई आहे. परंतु, या उपरही अंमली पदार्थ सेवनांचे आणि त्यांच्या विक्रीचा आलेख चढताच आहे. कारण या जाळ्यात उच्चपदस्थांपासून अनेक आघाडीचे उद्योजक, बॉलिवूडमधील कलाकार, पोलीस यंत्रणेतील काही कर्मचारी या साऱ्यांचा समावेश आहे. अनेकदा पकडण्यात येणाऱ्या नायजेरिन्सपासून ते पुनीत श्रुंगी, मनोज जैन, जयमुखी हे उद्योजक, विकी गोस्वामीसारखा तस्कर, किशोर सिंग राठोडसारखा माजी आमदाराचा मुलगा, ममता कुलकर्णीसारखी अभिनेत्री ते बेबी पाटणकर सारख्या सर्वसामान्य घरातील महिलेपर्यत हे जाळे खोलवर रुजले आहे. बेबी पाटणकरच्या जाळ्यात तर मुंबई पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला गेला आहे. कायद्यातील पळवाटा शोधून ते राजरोसपणे हा अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा व्यवसाय बिनदिक्कतपणे करीत आहेत. ठाण्यातील इफेड्रिन प्रकरणाने तर सातासमुद्रापार अमली पदार्थांचे उत्पादन, विक्री कशी चालते, त्यांच्या नेटवर्कमध्ये कोण कोण आहे, या साऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. परंतु, अजूनही आमचे राज्यकर्ते शहाणे व्हायला तयार नाहीत. हे असेच चालले तर एक दिवस ‘उडता पंजाब’ च नव्हे ‘उडता इंडिया’ नावाचा सिनेमा काढण्याची भुरळ बॉलीवूडला पडली नाही तर आश्चर्य वाटायला नको.
जिल्ह्यातील वागळे इस्टेट आणि नवी मुंबई भागात मोठ्याप्रमाणात आयटी पार्क विकसित झाले आहेत. याठिकाणी हजारो तरुणांना रोजगार मिळाला असून तेथील कामाचे स्वरूप आणि कामाची शिप्ट पाहता स्ट्रेस घालवण्यासाठी त्यातील असंख्य तरुण-तरुणी नशेच्या आहारी गेले आहेत. त्याचा नेमका फायदा ड्रग्ज माफिया घेत असून नायेरियन आणि मुंब्रा भागातील काही गुन्हेगार तरुणांना पेडलर बनवून ते बिनदिक्कतपणे आपले जाळे पसरवत आहेत. हे पेडलरचे जाळे बॉलिवूडपर्यंत पसरले आहे. शिवाय गांजा, अफूसारखे कमी किंमतीचे ड्रग्जही नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील कष्टकरी वर्गात सर्रास विकले जात आहे. येथील रॅकेट नवी मुंबई पोलिसांनी मोडून काढले असले तरी त्यातील आरोपी पुन्हा-पुन्हा डोके वर काढीत आहेत.
एमएमआरडीए क्षेत्रातील आठ महापालिका आणि आठ नगरपालिकांच्या क्षेत्रातील तरुणाईत ही विषाक्त नशा झपाट्याने फोफावत आहे. ठाणे पोलिसांनी गेल्या काही वर्षात याविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. इफेड्रिन, अल्प्राझोलम, कॅटामाईन, हशीश, ब्राऊन शुगर, एमडी पावडर अशा नानाविध नशिल्या पदार्थांचा साठा ठाणे पोलिसांनी देशाच्या विविध भागातून पकडला आहे.
आजमितीला ठाणे पोलिसांकडे २३०० किलो इफेड्रिनसह इतर अंमली पदार्थांचा सुमारे २८०० किलो साठा आहे. देशात इतक्या मोठ्या प्रमाणात साठा कुठेच नसावा. लॅटीन अमेरिकन देशांपासून पश्चिम बंगालच्या मालदा जिल्हा, गुजरातपर्यंतची ही साखळी आहे.
कधी कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून, तर कधी समुद्र आणि हवाईमार्गे हे पदार्थ जिल्ह्यातील महानगरांत पोचत आहेत. ठाणेसह नवी मुंबईतील आयटी पार्क आणि विविध इंजिनिअरींग आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्यांच्या पेडलर्संना अनायसे ग्राहक मिळत आहेत. यामुळे जिल्ह्यात त्यांच्या विक्रीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.
अमली पदार्थांच्या आहारी कॉलेज नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनाही या रॅकेटने ओढले. एमडी पावडरच्या आहारी किती मुले गेली आहेत, कशा पद्धतीने त्यांना ओढले, हे मुंब्य्रातील काही घटनांतून उघड झाले. शाळेसमोरील आईस्क्रिम विक्रेता ते शिक्षिकेपर्यंत त्यांचे जाळे होते. एमडीएससह इतर पदार्थांचा अमली द्रव्य म्हणून एनडीपीएस कायद्यात समावेश करावा, अशी मागणी पोलिसांकडून होत आहे. मग ते कोरेक्स सिरप असो वा इंक इरेझर, एमडी, कॅटामाईन, इफेड्रिनचा समावेश नार्कोटिक्स ड्रग्जमध्ये नाही. यामुळे पोलिसांना कारवाई करतांना अडचणी येतात.
अलिकडच्या काळात पुरुषच नव्हे, तर महिलाही या व्यवसायात मोठ्याप्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. ममता कुलकर्णी, बेबी पाटणकरच नव्हे तर चार दिवसांपूर्वीच कांदिवलीत पोलिसांनी २३ किलो गांजासह अटक केलेल्या गीता मुनीर शेख, जुबेदा चट्टी मुस्तफा शेख यासारख्या महिलाही आता सक्रीय झाल्या आहेत.
या सर्व घडामोडी पाहता १९८५ च्या एनडीपीस कायद्यात संशोधन करून त्यात नव्याने विकसित केलेल्या अनेक औषधे आणि ड्रग्जचा समावेश केल्यास गुन्हेगारांना वेसण घालण्यास मदत होणार आहे.
शिवाय एफडीए विभागातील अनागोंदीलाही वेसण घालणे गरजेचे असल्याचे इफेड्रिन प्रकरणाने सिद्ध झाले आहे. मात्र, त्यासाठी राज्यकर्त्यांकडे इच्छाशक्ती हवी, एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.
अलिकडची काही उदाहरणे पाहिल्यास डिसेंबर २०१४ मध्ये उनावजेरीयन, जस्टीन गग्बोनाको जॉय, युगो चुकूसा अजाज, सुलेमान ओकिक इकीन्योर्खो या चौघा नायजेरियन्सना पोलिसांनी ठाणे, नवी मुंबईतून पकडले होते. त्यानंतर मार्च २०१६ मध्ये कल्याण-डोंबिवलीच्या निळजे गावातून एक कोटी रूपयांच्या ब्राऊन शुगरचा साठा हस्तगत केला होता. कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटलजवळून एका आरोपीस पकडल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार हा साठा पकडला होता. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात भाड्याने शेतजमीन घेऊन तीत तो अफिमची लागवड करून त्यावर प्रक्रिया करून ब्राऊन शुगर तयार करीत असे. अशाच प्रकारे मार्च २०१६ मध्ये कुरियरद्वारे लॅटिन अमेरिकन देशातून कोकेनची आयात करून तिची विक्री करणाऱ्या विल्यम फॅ्रन्क यास नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागातून अटक करून त्याच्याकडून ४ कोटी रुपये किंमतीचे ६०० ग्रॅम कोकेन जप्त केले होते. तर आॅक्टोबर २०१६ मध्ये केलेल्या एका कारवाईत अब्दुल यूनूस कारोबारी ऊर्फ लालाभाई आणि मोहम्मद अयाज शेख ऊर्फ वल्ला भाई या दोघांकडून २० लाख रूपये किंमतीचे ६.५ किलो हशीश हस्तगत केले होते. याशिवाय गुजरात आणि महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पालघरच्या वाडा तालुक्यातील एका फार्म हाऊसमधून २७.५ कोटींचा मॅन्ड्रेक्सचा मोठा साठा पकडला होता, तर नोव्हेंबर २०१६ मध्येच एका कॉल सेंटर प्रकरणी केलेल्या कारवाईत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत झोलट्रेट १०, एल्टॅक्स १०, नायट्रोवेट १०, ओनापीन २ या औषधांच्या ५७ लाख रूपये किंमतीच्या १६ लाख टॅबलेट जप्त केल्या होत्या.आॅगस्ट २०१० मधील थेऊर येथील रेव्ह पार्टीत तर बड्या श्रीमंतांच्या पोरापोरींचा अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला नंगानाच संपूर्ण देशात गाजला होता. तेव्हा सुमारे ४८९ महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी त्यात सापडले होते. ठाणे पोलिसांनी ठाणे, सोलापूर, अहमदाबाद परिसरातून पकडलेल्या एव्हॉन लाईफ सायन्स कंपनीच्या इफेड्रिन प्रकरणाने तर देशातील सारेच रेकॉर्ड मोडले आहेत. स्वत:ला साध्वी म्हणवणारी बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचे या रॅकेटमधील रुप पहिल्यांदा चव्हाट्यावर आले.अमेरिका, ब्रिटनमधून कुरियरद्वारे त्या भारतात आणल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच या वर्षी जानेवारी २०१७ मध्ये अंबरनाथच्या सेंटार फार्मास्युटीकल कंपनीच्या गोदामातून १९ कोटी रुपये किंमतीचा अल्प्राझोलम या अमली पदार्थाचा साठा पकडला होता. नाशिकला अलिकडेच टाकल्या गेलेल्या एका पार्टीत तर अनेक वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची मुले सापडली होती. अशाच प्रकारे जुलै २०१५ मध्ये पुण्यातील हिंजवडीत टाकलेल्या रेव्ह पार्टीवरील धाडीत ६२ विद्यार्थी सापडले होते, तर सप्टेंबर २०१२ मधील वाघोलीत माया लंग्जमधील पार्टीत तर पेज थ्री घराण्यातील ३०० उच्च पदस्थ सापडले होते. एक एटीएस अधिकारी आणि त्याची पत्नी तेव्हा चौकशीच्या फेऱ्यात सापडले होते.