अन्नधान्य महागणार; एपीएमसीच्या वाहतूकदारांकडून पाच वर्षांनंतर भाडेवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 12:19 AM2019-12-31T00:19:47+5:302019-12-31T06:49:37+5:30
एपीएमसीमधील वाहतूकदारांचा निर्णय; खर्च वाढल्यामुळे पाच वर्षांनंतर भाडेवाढ
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या धान्य व मसाला मार्केटमधील रिटेल ट्रान्सपोर्ट ओनर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई या संघटनेने १ जानेवारीपासून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षांमध्ये वाहनांच्या किमती, इंधन व इतर खर्चामध्येही वाढ होत असल्यामुळे १० ते २० टक्के भाडेवाढ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
एपीएमसीच्या धान्य व मसाला मार्केटमधील सर्वात जुनी व मोठी वाहतूकदार संघटना म्हणून रिटेल ट्रान्सपोर्ट ओनर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईची ओळख आहे. दोन्ही मार्केटमध्ये ६०० पेक्षा जास्त वाहतूकदार या संघटनेचे सभासद आहे. धान्य व मसाल्याचे पदार्थ मार्केटमधून मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये पोहोचविण्याचे काम हे वाहतूकदार करत आहेत. पाच वर्षांपासून वाहतुकीच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, परंतु या वर्षामध्ये १० लाख रुपयांच्या गाडीचे दर १७ ते १८ लाख रुपये झाले आहेत. इंधनाच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खर्चामध्ये वाढ झाली असल्यामुळे जुन्या दरामध्ये मालाची वाहतूक करणे शक्य होत नाही. यामुळे १ जानेवारीपासून मालवाहतुकीच्या दरामध्ये १० ते २० टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर पवार व सचिव अब्दुल शेख यांनी याविषयी निवेदन प्रसिद्ध केले आहे. वाहतूकदारांचा तोटा वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रमुख संघटनेने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता इतर संघटना काय निर्णय घेणार याकडे बाजारसमितीमधील इतर घटकांकडे लक्ष लागले आहे.