नवी मुंबई : सल्फरडाय आॅक्साइड, नायट्रोजन आॅक्साइड आणि पार्टिक्युलेस मॅटर अर्थात धूलिकणांचे प्रमाण वाढत चाललेय. या घटकांचे नवी मुंबईतील प्रमाणही वाढत चालले आहे. यामध्ये तुर्भे, कोपरखैरणे, रबाळे, महापे या परिसरात वायुप्रदूषणाची समस्या वाढली आहे. सकाळी कडक ऊन आणि रात्री गार वारे अशा वातावरणात झालेल्या बदलामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. सुका खोकला आणि रक्तदाब असे विकार नागरिकांमध्ये बळावत आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात प्रदूषण वाढल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे.नवी मुंबईतून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असून, या महामार्गावर डिझेलवर चालणाºया मोठ्या गाड्यांची ये-जा चालू असते, तसेच बेलापूर-तळोजा मेट्रोचे काम सुरू असल्याने धुळीचे प्रदूषण वाढले आहे. नवी मुंबईच्या जवळच असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागातील अनेक कंपन्यांद्वारे सोडलेल्या दूषित धुरामुळेही प्रदूषण वाढत आहे. नवी मुंबईत सध्या सकाळच्या वेळी हवेत धुके दिसते, त्यात वाहनांचा धूर मिसळून ‘स्मॉग’ तयार झालेला दिसतो आहे. हा नागरी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.सकाळच्या वेळी शाळेत जाणारी मुले आणि कार्यालयात जाणारे कर्मचारी यांच्यासाठी ‘स्मॉग’चा सर्वाधिक धोका असतो. या व्यतिरिक्त ज्या वृद्ध व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झालेली असते, अशा वेळी हिवाळ्यात अथ्रायटिस, अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या समस्या उद्भवतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वायुप्रदूषणाची नोंद घेण्याकरिता नवी मुंबईत वाशी येथील रहिवासी परिसर, ऐरोलीतील गावठाण परिसर, नेरुळमधील रहिवासी परिसर, रबाळे येथील औद्योगिक विभाग, तसेच महापे येथील औद्योगिक विभागातात हवेच्या पातळीची विशेष नोंद घेतली जाते.गेल्या महिन्याभरातील ही नोंद पाहता यामध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणामुळे कोपरखैरणे तसेच तुर्भे परिसरातही प्रदूषणाची समस्या वाढली आहे.पावसाळा आणि उन्हाळ्याच्या तुलनेत यंदाच्या हिवाळ्यात रुग्णांच्या संख्येत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातील बहुतांश रु ग्णांना श्वसनासंबंधीच्या विकारांनी ग्रासले आहेत. हवेतील विषारी वायूमुळे शहरातील आरोग्य धोक्यात आले आहे. हवेच्या प्रदूषणामुळे रुग्णाच्या साध्या खोकल्याचे रूपांतर गंभीर खोकल्यामध्ये होते. प्राणवायू शरीरात घेण्याची फुप्फुसाची क्षमता वेगाने कमी होते. त्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशींना मिळणाºया प्राणवायूचे प्रमाण कमी होते. त्यातून अंगदुखी, अस्वस्थपणा, थकवा वाढतो, कार्यक्षमता कमी होते. हवेतील दूषित घटक श्वासातून रक्तात मिसळल्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम होण्याचा धोकाही असतो. - डॉ. समीर बन्सल, श्वसनविकारतज्ज्ञ.
वायुप्रदूषणामुळे आरोग्य समस्यांमध्ये वाढ, औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची हलगर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:54 AM