नवी मुंबई : पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी छापे टाकून गुन्हा दाखल केलेल्या नायझेरियनच्या पोलिस कोठडीत वाढ झाली आहे. तर काहींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या सूचनेनुसार मागील आठवड्यात सहा ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये ७४ नायझेरियन ताब्यात घेतले असता त्यापैकी २३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
नवी मुंबईतल्या ड्रग्स विक्रीच्या रॅकेटचा सुरुंग लावण्याचे काम पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून सुरु आहे. पदभार स्वीकारताच थर्टी फर्सच्या अगोदरच खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात नायझेरियनवर कारवाई केली होती. त्यानंतर १ सप्टेंबरला नियोजनबद्धरीत्या परिमंडळ एक मध्ये तीन ठिकाणी व परिमंडळ दोन मध्ये तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यामध्ये ७४ नायझेरियन व्यक्तींना ताब्यात घेतले असता. १४ जणांचा अमली पदार्थ विक्रीत सहभाग आढळून आला होता. तर ९ जणांचा व्हिजा संपलेला असतानाही ते बेकायदेशीर वास्तव्य करत असताना आढळून आले होते. याप्रकरणी वाशी, कोपर खैरणे, खारघर व तळोजा या चार ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्यानंतर तळोजा येथील नायझेरियनची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर वाशी येथील नायझेरियन्सला १० सप्टेंबर पर्यंत, कोपर खैरणेतील नायझेरियन्सना ११ सप्टेंबर पर्यंत व खारघर येथील नायझेरियन्सना ९ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडीत वाढ मिळाली आहे. त्यामध्ये इतरही काही सुगावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याद्वारे अटक केलेल्या नायझेरियन व्यक्तींना अमली पदार्थ पुरवणाऱ्या, बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.