दागिने चोरीच्या गुन्ह्यांत वाढ

By admin | Published: May 6, 2015 11:21 PM2015-05-06T23:21:40+5:302015-05-06T23:21:40+5:30

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सोन्याचे दागिने चोरीच्या घटना वाढल्या असून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Increase in jewelry stolen crimes | दागिने चोरीच्या गुन्ह्यांत वाढ

दागिने चोरीच्या गुन्ह्यांत वाढ

Next

जयंत धुळप,  अलिबाग
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सोन्याचे दागिने चोरीच्या घटना वाढल्या असून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्थानिक पोलिसांना या सोनेचोरांना गजाआड करण्यात अद्याप यश येत नसल्याने जनसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अलिबाग बस आगारात आपल्या पतीसह एसटी बसमध्ये चढत असताना संजना सदाशिव बलकवडे यांच्या पर्सच्या मधल्या खणात ठेवलेला सोन्याचे दागिने असलेला डबा चोरट्याने मोठ्या शिताफीने चोरून लंपास केला आहे. चोरीस गेलेल्या या सोन्याच्या दागिन्यांची किंमत एकूण ४ लाख ७९ हजार ५०० रुपये असल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली आहे.
गेल्या शनिवारी मध्यरात्री पेण तालुक्यातील वरेडी गावातील सुरेखा लहू कोळी यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील कपाट फोडून त्यातील ३४ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याप्रकरणी दादर सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवलीतील भाविका बळीराम मालोरे या १९ एप्रिल रोजी खारपाडा येथे सोन्याचे दागिने असलेली सुटकेस रस्त्याच्या बाजूला विसरून गेल्या होत्या. यातील २ लाख ५ हजार ५०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम यासह चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी कर्जत, भिसेगाव ते लोधिवली अशा प्रवासादरम्यान रिस मोहोपाडा येथील गृहिणी दीपाली संतोष भंडारकर यांच्याकडील कापडी पिशवी मोठ्या शिताफीने कापून त्यातील तब्बल ४ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तीन चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरूच
> नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये सोनसाखळी चोरांनी पुन्हा धुमाकूळ सुरू केला आहे. चोवीस तासांमध्ये ८ महिलांच्या गळ्यातील तब्बल ३ लाख ४१ हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावण्यात आले असून यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सीबीडीमध्ये मंगळवारी दुपारी एका महिलेस धक्का देऊन चोरट्यांनी पाडले आणि तिच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावण्यात आली. चोरटे सोनसाखळी हिसकावण्यासाठी महिलांवर हल्लाही करू लागल्यामुळे महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

> नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. ऐरोली सेक्टर-१० मध्ये राहणाऱ्या स्मिता बोरकर ही महिला मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता पायी जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. सीबीडीमध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिजाबाई पाटील या महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली.

> नेरूळ सेक्टर-२४ मध्ये राहणाऱ्या सुशीला बंडगर यांच्या गळ्यातील ३६ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली आहे. पनवेलमधील तक्का गाव येथे राहणाऱ्या मधुमती प्रवीणकुमार या महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली आहे. बुधवारी सकाळी तीन घटना घडल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

> वाशी सेक्टर-१६ मध्ये राहणाऱ्या अश्विनी घरत या वाशी बसडेपोतून जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली आहे. घणसोलीमध्ये राहणाऱ्या सुलभा जाधव या रोडने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे.


> कोपरखैरणे सेक्टर-१० मधून पायी जाताना बागाम्मीमनमी या महिलेच्या गळ्यातील २७ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी खेचून नेली. गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल आठ घटना घडल्या आहेत. यामध्ये सात महिला व एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांनाही लक्ष्य केले जात आहे. सोनसाखळी चोरट्यांंना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

> खैरणे एमआयडीसीमधील रियल व्हॅली कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकांना चार जणांनी चाकूचा धाक दाखवून कंपनीमधील १ लाख रुपये किमतीचे ५ मोठे मशिनचे पार्ट हिसकावून नेले आहेत. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या चेन स्रॅचिंगमुळे महिलांना घराबाहेर पडणे असुरक्षित वाटत आहे.

Web Title: Increase in jewelry stolen crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.