अलिबाग : देशाच्या सद्यस्थितीचा आरसा म्हणजे त्या देशाच्या समाज व्यवस्थेमधील स्त्रियांचे स्थान आहे. दुर्देवाने फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या नावाने पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात व त्यात रायगड जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. या अत्याचारांपासून मुक्ती मिळवण्याकरीता स्त्री निर्भयतेचे दर्शन घडविणारा पतंगोत्सव असल्याचे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी केले. नई उमंग बेटी के संग, बेटी जिंदाबाद अभियान शुभारंभ प्रसंगी महिला अत्याचार विरोधी मंचाच्या प्रवर्तकांना मार्गदर्शन करण्याकरीता पेण मध्ये आयोजित मेळाव्यात पाटील बोलत होत्या. नई उमंग बेटी के संग, बेटी जिंदाबाद या अभियानाची सांगता संक्रातीच्या दिवशी महिला व मुली पतंग उडवून करणार आहे. उपेक्षित महिलांचा गुढीपाडवा चित्रपट महोत्सव, सावित्रीचा जागर हे अभियान म्हणजे पतंगाच्या दोरीपासून तिरंग्याच्या दोरीपर्यंत महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्याचे असल्याचे प्रतिपादन वैशाली पाटील यांनी केले.कुप्रसिध्द निर्भया बलात्कार प्रकरणानंतर महिलांना मोकळा श्वास घेण्याच्या उददेशाने या महिला अत्याचार विरोधी मंचाची स्थापना करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या स्त्रि-पुरूषांच्या एकत्रितपणे सुरू केलेल्या चळवळीने विविध उपक्रम राबविले आहेत. यामध्ये अंकुर ट्रस्ट या संस्थ्ोच्या सहायाने माहितीपट महोत्सवाचे नुकतेच आयोजन केल्याची माहिती निशरीन भारमल यांनी यावेळी दिली. पेण न. पा. हददीत कन्या शाळा, उर्दू शाळा तरणखोप, पी,एन.पी. आशाकिरण कॉन्वेंट स्कूल पानेड , आई डे केअर संस्था यांच्या सहयोगाने शासकिय आदिवासी मुलींचे वसतिगृह पेण या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात स्त्री पुरु ष समानता, पर्यावरण व स्त्रिया, लिंगभेद , दुसरी निर्भया का अशा सारख्या विषयांवरील माहितीपट दाखवून चर्चा करण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)
महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले
By admin | Published: January 14, 2017 6:49 AM