तिवरांच्या संख्येत वाढ
By admin | Published: April 9, 2016 02:25 AM2016-04-09T02:25:31+5:302016-04-09T02:25:31+5:30
मुरुड तालुक्याची लोकसंख्या ६५ हजाराच्या वर असून, २४ ग्रामपंचायती आहेत. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला साळाव ते नांदगाव तर दक्षिण बाजूस मुरुड ते सावली असा सागरीकिनारा लाभला आहे.
संजय करडे, नांदगाव
मुरुड तालुक्याची लोकसंख्या ६५ हजाराच्या वर असून, २४ ग्रामपंचायती आहेत. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला साळाव ते नांदगाव तर दक्षिण बाजूस मुरुड ते सावली असा सागरीकिनारा लाभला आहे. तालुक्याचा बहुतांशी भाग समुद्रकिनाऱ्याला लागून असल्याने समुद्राच्या भरती रेषेचे पाणी असंख्य शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने ही शेतजमीन नापीक होत आहे. शेतजमीन खारट झाल्याने येथील शेतकऱ्यांनी शेती सोडून दिली, त्यामुळे अशा जमिनीत समुद्राचे पाणी शिरून कालांतराने तिवरांची संख्या वाढत आहे. यासाठी खार बंदिस्त बंधारे बांधण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
महसूल व वन मंत्रालयाने तिवरांच्या वृक्षांना विशेष संरक्षित केले आहे. तिवरांची झाडे तोडल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो, अशी माहिती परिमंडळ वन अधिकारी मुरुड विलास फंडे यांनी दिली. खारलँड विभागाकडून गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांनी मागणी करून सुद्धा खार बंदिस्त बंधारे निर्माण करता आलेले नाहीत. तसेच जे खार बंदिस्त बंधारे मोडकळीस आले अथवा नष्ट होत आहेत, त्याची दुरुस्ती सुद्धा करण्यात येत नसल्याने अमावस्या व पौर्णिमेच्या मोठ्या भरतीला या बंधाऱ्यावरून पाणी शेतात घुसून शेतजमीन नापीक होत आहे. यामुळे शेतकरी नाराज असून, खार बंदिस्त बंधारे बांधण्यात यावे अशी मागणी करीत आहेत.
याबाबत अंबोली ग्रामपंचायतीचे सरपंच व शेतकरी मनोज कमाने म्हणाले, की अंबोली खारभूमीचा बंधारा नादुरुस्त झाला आहे तो त्वरित दुरुस्त व्हावा, अशी मागणी करणारे निवेदन आम्ही खार भूमी खात्याकडे एक वर्षापूर्वी दिले होते. परंतु या खात्याकडून कोणताच प्रतिसाद नाही. या बंधाऱ्यावरील समुद्राचे पाणी आत वा बाहेर जाण्यासाठी असणाऱ्या मोऱ्या खूप खराब व नादुरुस्त झाल्या होत्या. या विभागाचा कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने असंख्य शेतकरी एकवटून अखेर श्रमदानातून हे काम पूर्ण केले. ४० वर्षांपूर्वीचा हा बंधारा असून, पावसाळ्यापूर्वी जर हे काम पूर्ण झाले नाही तर समुद्राचे पाणी शेतात शिरून असंख्य एकर शेतजमीन नापीक होईल, अशी भीती कमाने यांनी व्यक्त केली. समुद्राचे पाणी शिरल्याने बहुतांशी शेतात आता तिवरांची संख्या वाढली आहे.
वाढती लोकसंख्या व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतकऱ्यांची मुले वेगळा संसार थाटून वेगळे घर बांधू इच्छितात. परंतु त्यांच्या मालकीच्या जमिनीत तिवर वाढल्याने तिथे घर बांधताना खूप समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वन खाते व महसूल खाते आडकाठी आणून काम थांबवतो. यामुळे वाढती तिवरांची संख्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.