नवी मुंबई : महापालिकेच्या घणसोली नोड्समध्ये मोकळ्या भूखंडावर अनधिकृत झोपड्यांनी अतिक्रमण केले आहे. घणसोली नोड्स सेक्टर ४ येथे माजी नगरसेविका उषाताई पाटील यांच्या प्रयत्नाने महापालिकेच्या वतीने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून नवी मुंबई हरित क्षेत्र म्हणून ‘अमृत अभियान’ सुरू केले आहे. मात्र या ठिकाणी मोकळ्या भूखंडांवर काही अनधिकृत झोपड्या बांधल्या असल्याने शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत असल्याची टीका माजी नगरसेविका उषाताई पाटील यांनी केली आहे.
या झोपडपट्टीवासीयांकडून अमली पदार्थाचे सेवन होत असल्यामुळे येथून रात्री अपरात्री येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. मागील वर्षी चोरीच्या प्रकरणात याच झोपड्यांमधील काही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. होणारी अस्वच्छता व त्यामुळे होणारा डासांचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या बनली आहे. या झोपड्यांमधून अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून, उद्योजक तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त येथून येणारे-जाणारे चाकरमानी बेजार झाले आहेत. या प्रकरणी घणसोली विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांच्याकडे कारवाई संदर्भात ४ ते ५ वेळा तक्रारी करूनही त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची टीका भाजपचे जिल्हा संघटक कृष्णा पाटील यांनी केली आहे.
घणसोली सेक्टर ४ येथील अमृत अभियानामध्ये अनधिकृत झोपड्या वाढल्या आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या काळात पोलीस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे कारवाई करण्यास विलंब होत आहे. पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यावर त्वरित कारवाई करून झोपड्या हटविण्यात येतील. - महेंद्रसिंग ठोके, विभाग अधिकारी, घणसोली ‘एफ’ विभाग.