नवी मुंबईतील उद्यानांच्या समस्येत वाढ; झाडाच्या फांद्या पडल्या, कचराकुंड्या तुटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:42 PM2020-08-28T23:42:16+5:302020-08-28T23:42:33+5:30
पालिकेकडून देखभाल नाही
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई शहरातील उद्यानांमध्ये नागरिकांना बंदी करण्यात आली होती, परंतु आता उद्याने खुली करण्यात आलेली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून उद्यानांची आणि मैदानांची देखभाल आणि दुरुस्ती केली नसल्याने उद्यानांची दुरवस्था झाली आहे. यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून अनेक उद्याने विकसित करण्यात आली असून, नागरिकांना, लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, आसन व्यवस्था आदी अत्याधुनिक सुविधा निर्माण करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही उद्यानांना पसंती दिली असून, नवी मुंबई शहराला उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात महापालिकेच्या माध्यमातून उद्याने बंद ठेवण्यात आली होती.
सद्यस्थितीत उद्याने सुरू करण्यात आली आहेत, परंतु गेल्या काही महिन्यांपासून उद्यानांच्या आणि मैदानांच्या देखभाल, दुरुस्तीकडेही महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. पावसात झालेल्या वादळामुळे उद्याने आणि मैदानांमधील अनेक मोठी झाडे आणि फांद्या पडल्या होत्या, त्या अद्याप उचलण्यात आलेल्या नाहीत. मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत उगवले असून, उद्यानात बसविण्यात आलेल्या कचराकुंड्या तुटून पडल्या आहेत. आसन व्यवस्थाही खराब झाली आहे. त्यामुळे उद्यानात येणारे नागरिक आणि मैदानात येणाºया खळाडूंना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उद्याने आणि मैदानांमधील समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.