अर्थसंकल्पामध्ये ३०० कोटी रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:41 PM2020-02-26T23:41:09+5:302020-02-26T23:41:19+5:30

४,१५० कोटींच्या खर्चास स्थायी समितीची मंजुरी; अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे

An increase of Rs 2 crore in the budget | अर्थसंकल्पामध्ये ३०० कोटी रुपयांची वाढ

अर्थसंकल्पामध्ये ३०० कोटी रुपयांची वाढ

Next

नवी मुंबई : आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीमध्ये चर्चा करण्यात आली. स्थायी समितीने मूळ अंदाजपत्रकामध्ये ३०० कोटी रुपयांची वाढ करून ४,१५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला जाणार असून, तेथे किती वाढ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्थायी समितीमध्ये १८ फेब्रुवारीला २०२०-२१ साठीचे ३,८५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. स्थायी समितीमध्ये बुधवारी या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी मालमत्ताकर विभागाला ६३० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. स्थायी समितीने त्यामध्ये १५० कोटींची वाढ करून ७८० कोटी रुपये केले आहे. नगर रचना विभागाचे उद्दिष्ट १२५ कोटींवरून २२५ कोटी व स्थानिक संस्था कराचे उद्दिष्ट १,२५० कोटींवरून १,३०० कोटी रुपये करण्यात आले आहे. आयुक्तांनी परिवहनसाठी ९५ कोटी रुपये अनुदान मंजूर केले होते. स्थायी समितीने त्यामध्ये तब्बल ४२ कोटी ७५ लाख रुपयांची वाढ केली असून, १३७ कोटी ७५ लाख रुपये केले आहे. परिवहन डेपोसाठी जमीन विकत घेण्यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उघड्या नाल्यांचे काम करण्यासाठी मूळ अंदाजपत्रकामध्ये १२ कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यामध्ये वाढ करून तरतूद १५० कोटी रुपये करण्यात आली आहे.

सदस्यांची अनुपस्थिती
महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी बुधवारी स्थायी समिती सभा बोलाविण्यात आली होती. सकाळी ११ वाजता सुरू होणारी सभा तब्बल दीड तास उशिराने सुरू झाली. या सभेला सभापतींसह नऊ सदस्य उपस्थित होते. दुपारी २:३० वाजता जेवणासाठी एक तासाची सुट्टी करण्यात आली; परंतु सदस्यांची संख्या कमी झाल्याने ३:३० वाजता सुरू होणारी सभा ४:३० वाजता सुरू झाली. जेवणाच्या सुट्टीनंतर सभापतींसह पाच सदस्य सभेला उपस्थित होते.

सर्वच एनएमएमटी डेपोंची बांधणी करावी, त्या ठिकाणी निर्माण करण्यात येणाऱ्या विविध सुविधा आणि उपाययोजनांमधून महापालिकेला उत्पन्न प्राप्त होणार आहे. शहरातील सर्व नोडमध्ये अद्ययावत वाहनतळ उभारण्यात यावेत.
- डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक, प्रभाग क्रमांक १०४

विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ पादचारी पूल उभारण्यात यावा. तलावांची चांगल्या पद्धतीने सुधारणा करण्यात यावी. गावठाण भागासाठी अग्निशमनच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
- ज्ञानेश्वर सुतार, नगरसेवक, प्रभाग क्र मांक ८९

शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, त्यामधून कोट्यवधी रु पयांची वसुली होऊ शकते. पदपथावरील फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसून, भरारी पथकावर नाहक खर्च होत आहे.
- सलुजा सुतार, नगरसेविका, प्रभाग क्र मांक ९९

अभय योजनेच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर कराव्यात, यामुळे थकीत करवसुली होण्यास मदत होणार आहे. फेरीवाल्यांवर निर्बंध घालणे गरजेचे आहे.
- चेतन नाईक, नगरसेवक, प्रभाग क्र मांक २२

शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी शहरात मुख्य चार प्रवेशद्वार उभारणे गरजेचे आहे. सिडकोकालीन गंजलेल्या पाण्याच्या मुख्य वाहिन्या बदलण्यात याव्यात.
- रवींद्र इथापे, सभागृह नेता

सीबीडी येथे रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी असतात, यासाठी ट्रक टर्मिनल उभारावे. आयकर कॉलनी समोर असलेल्या डॅमची सुधारणा करण्यात यावी. तसेच तलावात कारंजे आणि नौकाविहार सुरू केल्यास उत्पन्न प्राप्त होणार आहे.
- सरोज पाटील, नगरसेविका, प्रभाग क्र मांक १०१

सदस्यांनी केलेल्या विविध सूचनांनुसार ३०० कोटींची वाढ करून ४१५० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी महासभेत सादर केला जाणार आहे.
- नवीन गवते, सभापती, स्थायी समिती

Web Title: An increase of Rs 2 crore in the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.