वाहनचोरीसह महिलांवरील अत्याचारात वाढ

By Admin | Published: January 8, 2017 02:58 AM2017-01-08T02:58:54+5:302017-01-08T02:58:54+5:30

पोलिसांनी वर्षभर केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे २०१५ च्या तुलनेमध्ये ६०० कमी गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ६७ वरून ७० टक्के झाले आहे.

Increase in violence against women with vehicle trade | वाहनचोरीसह महिलांवरील अत्याचारात वाढ

वाहनचोरीसह महिलांवरील अत्याचारात वाढ

googlenewsNext

नवी मुंबई : पोलिसांनी वर्षभर केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे २०१५ च्या तुलनेमध्ये ६०० कमी गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ६७ वरून ७० टक्के झाले आहे. चोरी घरफोडीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे; पण वाहनचोरी व महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नवीन वर्षामध्ये ते गुन्हे कमी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
शहराच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे संभाव्य गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलिसांपुढे आहे. घरखरेदीच्या बहाण्याने बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीसह ठकबाजी करून फसवणुकीच्या घटना शहरात घडत आहेत. त्याशिवाय दररोज घडणाऱ्या घरफोडी, सोनसाखळीचोरी, वाहनचोरी, अशा गुन्हेगारी घटनांच्याही तपासाची डोकेदुखी पोलिसांना आहेच. बांधकाम व्यावसायिकांकडून घरखरेदी-विक्रीच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीतून करोडो रुपयांची अफरातफर होत आहे. त्यामुळे अशा घटनांचा गांभीर्याने तपास करण्यासाठी गुन्हे शाखेतर्फे आर्थिक विभाग तयार करण्यात आलेला आहे. या विभागाने ४१० गुन्हे दाखल करून २७० गुन्ह्यांमधील आरोपींवर कारवाई केली आहे. त्यापैकी ५६ गुन्हे बिल्डरांच्या विरोधातील आहेत. त्यापैकी काही बिल्डर्सवर कारवाई करून न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची संपत्ती जप्त केल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. तर काहींची मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयाकडे विनंती केली असून, त्यामध्ये बालाजी बिल्डर्स, व्हाइट हाउस, एस. पी. असोसिएट्स या बिल्डर्सचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरात पूर्ववैमनस्यातून घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या विशेष घटना नसल्या तरीही, किरकोळ कारणातून हत्येचे गुन्हे घडलेले आहेत. गतवर्षात अशा ४२ हत्या झाल्या असून त्यापैकी ३५ गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, उर्वरित हत्येच्या गुन्ह्यांचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. तर जबरी दरोड्याच्या दहा घटना घडल्या असून, त्या सर्वच गुन्ह्यांची उकल झालेली आहे. यामध्ये सीवूडमधील पॉप्युलर फायनान्सवरील दरोड्याचाही समावेश आहे. या गुन्ह्यात ६ जणांना अटक झाली असून, त्यांच्या ५ साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. २०१५मध्येही घडलेल्या १७ पैकी १७ दरोड्यांच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. शहरात नोकरवर्ग मोठ्या संख्येने असून ते कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्यांचे घर बंद असते. याच संधीचा फायदा घेत, शहरात घरफोडी करणाऱ्या टोळ्यांनी डोके वर काढले आहे. दिवसा तसेच रात्री त्यांच्याकडून घरफोड्या केल्या जात आहेत; परंतु गतवर्षी पोलिसांनी विविध टोळ्यांविरोधात कारवाईचा फास आवळल्यामुळे २०१५च्या तुलनेत २०१६मध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचा विश्वास पोलीस आयुक्त नगराळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
याप्रसंगी सहआयुक्त मधुकर पाण्डे, उपआयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ २चे उपआयुक्त राजेंद्र माने, वाहतूक शाखा उपआयुक्त नितीन पवार, विशेष शाखा उपआयुक्त तुषार दोशी, प्रशासन उपआयुक्त सुधाकर पाठारे आदी उपस्थित होते.

आठ बारवर कारवाई
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी
८ बारवर व दोन आॅर्क्रेस्ट्रावर नियमभंगाची कारवाई केलेली आहे. सद्यस्थितीला आयुक्तालयात २२ बारला आॅर्क्रेस्ट्राची परवानगी आहे. त्यापैकी पाच परवाने गतवर्षी देण्यात आलेले आहेत.

सुरक्षेची थकबाकी
राजकीय अथवा व्यावसायिक व्यक्तींना मागणीनुसार अंगरक्षक म्हणून पोलीस पुरवले जातात. त्यासाठी संबंधिताला पोलिसांच्या सेवेचा शुल्क भरावा लागतो. मात्र, मागील पाच वर्षांत अनेकांनी अंगरक्षकाचे शुल्क भरलेले नाही. सुमारे ९७ लाख रुपयांची ही थकबाकी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, ती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांनी सांगितले.

२६ शस्त्रपरवाने रद्द
आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण १,६३७ जण परवाना असलेले शस्त्रधारक आहेत. गतवर्षात ७ नवे परवाने देण्यात आले असून, ५ शासनाच्या निर्देशानुसार देण्यात आले आहेत. तर परवाना असलेल्या शस्त्रांचा गैरवापर अथवा संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे गतवर्षात २६ शस्त्रपरवाने रद्द, तर १ निलंबित करण्यात आला आहे.

वाहनचोरीचे आव्हान
वाहनचोरीच्या गुन्ह्यांत शहराबाहेरच्या टोळ्या सक्रिय असून, काही स्थानिक तरुणांचाही त्यात समावेश आहे. त्यापैकी अनेकांना रंगेहाथ अथवा सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी पकडलेले आहे; चोरलेले वाहन पामबीच मार्गे अथवा सायन-पनवेल मार्गाने काही मिनिटांत शहराबाहेर नेले जात आहे. त्यामुळे वाहनचोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून वारंवार केल्या जात आहेत.

गुन्हेगारांवर पाळत
गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांतर्फे लक्ष ठेवले जात आहे. त्यापैकी काहींना तडीपारही करण्यात आले आहे. त्याशिवाय ज्यांना जामीन मिळालेला आहे, अशा गुन्हेगारांचा जामीन न्यायालयातून रद्द करण्याचाही प्रयत्न पोलीस करणार आहेत. तर काही सराईत टोळ्यांवर मोका अथवा एमपीडीए अंतर्गत कारवाईचेही पाऊल येत्या काळात पोलिसांकडून उचलले जाणार आहे.

सुरक्षारक्षक एजन्सीवर कारवाई
पोलिसांच्या परवाना विभागामार्फत गतवर्षात ५८ नव्या सुरक्षारक्षक एजन्सीला परवाना देण्यात आलेला आहे. त्याशिवाय नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गतवर्षात विंद्याचल एजन्सीचा परवानाही रद्द करण्यात आलेला आहे.

पोलीस आयुक्तांचा पालिकेला टोला
महापालिकेतर्फे पोलिसांना पत्र देऊन काही प्रकरणांमधील भूमाफियांवर मोका लावण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. यासंबंधी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे पत्रकार परिषदेत विचारणा केली असता, त्यांनी अप्रत्यक्षरित्या कोणावर मोका लावायचा की नाही, हे इतरांनी सांगण्याची गरज नसून, आम्हाला आमचे काम चोख येते, असा टोला मारला. यावरून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबत पोलीस आयुक्तांचे असलेले मतभेद दुसऱ्यांना उघड झाले.

Web Title: Increase in violence against women with vehicle trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.