सिडकोमध्ये वाढले लाचखोरीचे प्रमाण; सहा महिन्यांत तीन अधिकाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 11:18 PM2019-12-08T23:18:08+5:302019-12-08T23:19:00+5:30
राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाºया सिडकोतील कथित भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाºया सिडकोतील कथित भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे. या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सिडकोच्या वतीने विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यानंतरही भ्रष्टाचाराच्या घटनांना आळा बसू शकला नाही. कारण सहा महिन्यांत विविध प्रकरणांत तीन अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे संबंधित विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
सिडकोतील भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने आतापर्यंत अनेक समितीही गठित केल्या आहेत. या समित्यांनी काय चौकशी केली, कोणावर काय कारवाई केली, हा विषय गुलदस्त्यातच आहे. असे असले तरी सध्या सिडकोच्या विविध विभागांत बोकाळलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी संबंधित विभागाची कसरत होत आहे. मागील सहा महिन्यांत अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील नियंत्रक पी. बी. राजपूत, त्यांचे सहकारी खडसे आणि गेल्या आठवड्यात सहायक वसाहत अधिकारी सागर तापडिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तर आर. आर. पाटील या कर्मचाºयाच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या दीड दशकात नवी मुंबईतील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. नवी मुंबईतील बहुतांशी जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. त्यामुळे भूखंडांचे श्रीखंड लाटणाºया प्रवृत्तींनी अधिकारी व कर्मचाºयांशी अर्थपूर्ण युती करून सिडकोत उच्छाद मांडला आहे. विविध विभागात पोसलेला हा भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून सिडकोत दक्षता विभागाची स्थापना केली.
या विभागाच्या प्रमुखपदी पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयांची नेमणूक केली. त्यानुसार पाच वर्षांपूर्वी प्रज्ञा सरवदे यांची सिडकोच्या पहिल्या मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे काही काळ सिडकोतील भ्रष्टाचाराच्या घटनांना आळा बसला. सध्या निसार तांबोळी हे सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून, म्हणजेच मागील सहा महिन्यांत लाचखोरीची तीन प्रकरणे उजेडात आली आहेत.
विशेष म्हणजे, कारवाईच्या जाळ्यात अडकलेले तिन्ही अधिकारी तरुण आहेत. त्यावरून सिडकोत दाखल होणाºया अधिकारी व कर्मचाºयांची मानसिकता विविध मार्गाने केवळ पैसे कमविणे इतकीच असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सिडकोतील नव्या दमाच्या अधिकाºयांना महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी देऊ नये, असा मतप्रवाह सिडकोच्या जुन्या व वरिष्ठ अधिकारी वर्गातून पाहवयास मिळत आहे.
तक्रारींचा खच
भ्रष्टाचाराविषयक अनेक तक्रारी सिडकोच्या मुख्य दक्षता विभागाकडे पडून आहेत. यात विविध विभागातील जुन्या व नवीन अधिकारी-कर्मचाºयांचा समावेश आहे. मुख्य दक्षता अधिकारी या प्रकरणांचा निपटारा करीत आहे. अनेक प्रकरणांत विभागीय चौकशी सुरू आहे. यावरून सिडकोतील भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढीस लागल्याचे स्पष्ट होत आहे.