तळोजातील सीईटीपीच्या क्षमतेत वाढ; प्रदूषण नियंत्रणात येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:16 AM2020-01-14T00:16:10+5:302020-01-14T00:16:17+5:30
केंद्र पुनर्जीवित करण्यासाठी ७३.५ कोटींचा खर्च; काम पूर्णत्वास
वैभव गायकर
पनवेल : तळोजा आद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा विषय राज्यभर चांगलाच गाजला आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रदूषणासंदर्भात याचिका दाखल झाल्यानंतर एमआयडीसीच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल झाले. यात औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी केंद्राच्या (सामाईक सांडपाणी प्रक्रिया) विस्तारीकरणाचा विषय पुढे आला. नव्याने उभारण्यात आलेले सीईटीपी केंद्र कार्यान्वित झाल्याने आता एमआयडीसीमधील प्रदूषण नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.
तळोजातील सीईटीपी केंद्राच्या विस्तारीकरणाला २०१८च्या नोव्हेंबरमध्ये सुरुवात झाली. पूर्णपणे बंद पडलेले हे केंद्र नव्याने कार्यान्वित करण्याचे काम एकवाकेम इव्हेरो इंजिनीअर व के. डी. पाटील कन्ट्रक्शन यांनी संयुक्तिकरीत्या केले. यामुळे तळोजा एमआयडीसीमधील
२२ एमएलडी क्षमता असलेल्या प्रकल्पाची क्षमता ५ एमएलडीने वाढून २७.५ एमएलडी इतकी झाली आहे. ३१ डिसेंबर, २०१९ पासून हे केंद्र नव्याने कार्यान्वित झाले आहे.
तळोजा एमआयडीसीमध्ये सद्यस्थितीत ९२५ पेक्षा जास्त कारखाने आहेत. यामध्ये ३५० रासायनिक कारखान्यांचा समावेश आहे. रासायनिक कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रियेसाठी सीईटीपी केंद्रात येते. मात्र, सीईटीपीची अपुरी क्षमता, तसेच बंद पडलेली यंत्रणा लक्षात घेता, बहुतांश कंपन्यांतील पाणी प्रक्रिया न करताच खाडीत, नदीत सोडले जायचे. याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश दिल्यावर एमआयडीसीने सीईटीपी केंद्राची क्षमता वाढविण्याचा व दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या १३ महिन्यांपासून इव्हेरो इंजिनीअर व के. डी. पाटील कन्ट्रक्शन यांच्यामार्फत केंद्राचे काम सुरू होते. ते आता पूर्णत्वाला आल्याने कासाडी नदीत सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यावर नियंत्रण येणार आहे. एमआयडीसीच्या नियंत्रणाखाली केंद्राचे विस्तारीकरण व्हावे, म्हणून तळोजा एमआयडीसीला पुनर्जीवित करून प्रक्रिया करण्याची क्षमता वाढविण्यासाठी ७३.५ कोटी रुपयांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सीईटीपीचा प्रकल्प पुन्हा नव्याने उभारून पुढील पाच वर्षांसाठी देखभाल, दुरुस्ती करण्याच्या कामासाठी देण्याचे ठरले आहे.
प्रदूषणासंदर्भात स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या संदर्भात अंतिम निर्णय येणे अद्याप बाकी आहे. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाने वेळोवेळी दंडात्मक कारवाई करून प्रदूषणकारी कारखाने बंद केले आहेत, तर काही कंपन्यांकडून १० कोटींपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणावरून दंडात्मक कारवाईच्या रूपात वसूल केली आहे. नवीन केंद्र कार्यान्वित झाल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटीशर्तीनुसार, हे फेज १ आणि २ मध्ये सीओडी आणि बीओडी नियंत्रणात येणार आहे.
तब्बल ४,३०० टन गाळ काढला
तळोजातील सीईटीपी प्रक्रिया केंद्र उभारताना जुन्या केंद्राची स्वच्छतादेखील करण्यात आली. यावेळी सुमारे ४,३०० टन गाळ काढण्यात आला. नव्याने उभारलेल्या सीईटीपी केंद्र १ आणि २ मध्ये नवीन पंप, टर्बो ब्लॉवर्स, नवीन मिक्सरच्या साहाय्याने हे केंद्र कार्यान्वित आहे. अद्यापही केंद्रातील दुसºया टप्प्यातील ३,००० टन गाळ काढण्याचे काम बाकी आहे.