पनवेल पालिकेत ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ, रुग्ण वाढल्याने काळजीत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:11 AM2020-09-14T00:11:59+5:302020-09-14T00:12:20+5:30
सद्य परिस्थितीत सॅनिटायझरची मागणी घटली असल्याचे पनवेल येथील मंगेश सर्वदे या औषध विक्रेत्यांनी सांगितले.
कळंबोली : पनवेल पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यामुळे पनवेलकरांच्या काळजीत भर पडली आहे. वाढत्या रुग्णांमुळे पनवेलकरांचा स्वत:ची काळजी घेण्यासाठी विविध घरगुती उपाय करत आहेत. त्याचबरोबर औषध विक्रेत्याकडून आॅक्सिमीटर, थर्मल गन घेण्याकडे कल वाढला आहे, तर सॅनिटायझरची मागणी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या १५ हजारांच्या उंबरठ्यावर आहे, यामुळे पनवेल पालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, पनवेल परिसरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. अनलॉकमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, व्यापारी, कामगार, रोजंदारीवर काम करणारे नागरिक घराबाहेर पडत आहेत. सुरक्षिततेसाठी घरीच हळदीचे दूध, गरम वाफ घेणे आदी उपाय केले जात आहेत. त्याचबरोबर, औषधी दुकानातून आॅक्सिमीटर खरेदी करण्याचा कल वाढला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे व कोरोना संसर्ग नसलेले नागरिक आपल्या शरीरातील आॅक्सिजन पातळी तपासण्यासाठी आॅक्सिमीटरचा वापर तर शरीरातील तापमान चेक करण्यासाठी थर्मल गनची खरेदी करत आहेत. त्यामुळे आॅक्सिमीटरच्या मागणीत वाढ झाली आहे. सद्य परिस्थितीत सॅनिटायझरची मागणी घटली असल्याचे पनवेल येथील मंगेश सर्वदे या औषध विक्रेत्यांनी सांगितले.
किमती घटल्या
- पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध औषधी दुकानांत चार महिन्यांअगोदर तीन ते चार हजार रुपये किंमत होती. मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने मध्यंतरी आॅक्सिमीटरचा तुटवडा भासत होता.
- अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक कंपन्यांद्वारे आॅक्सिमीटर व थर्मल गनच्या उत्पादनात वाढ केल्यामुळे किमतीत घट झाली आहे. विविध कंपन्यांचे आॅक्सिमीटर ५०० ते १,००० रुपयांत मिळत असल्याने मागणीत वाढ झाली आहे.
मास्कच्या मागणीत घट
पनवेल, कळंबली, कामोठे परिसरातील नागरिक सुरुवतीला एन ९५च्या मास्कचा वापर करण्यावर भर दिला जात होता. कालांतराने घरगुती मास्कचा वापर वाढल्याने औषध दुकानातून मास्क खरेदी घटली आहे.