नवी मुंबई : शहरातील तापमान ३८ डिग्री अंश सेल्सिअसवर गेले आहे. वाढता उकाडा, तसेच हवेतील दमटपणामुळे सर्वच नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी नागरिकांची पावले रसवंतीगृह, शीतपेयांकडे वळू लागली आहेत. शहाळे, लिंबू व इतर शीतपेयांची मागणी वाढली आहे.नवी मुंबई परिसरातील कमाल तापमान ३८ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आहे. तर किमान तापमानातही वाढ झाली. दिवसा घराबाहेर पडणाºया नागरिकांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. माथाडी व इतर कष्टाची कामे करणाºया नागरिकांना उकाड्याचा खूपच त्रास होऊ लागला आहे. असह्य उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी नागरिक फळांचा रस, रसवंतीगृह तसेच शीतपेयांचा आधार घेऊ लागले आहेत. उसाची मागणी सर्वाधिक वाढली आहे. मुंबई, नवी मुंबई परिसरात रोज २०० ते ३०० टन ऊस रसवंतीगृहांसाठी लागत आहे. अहमदनगर जिल्ह्यातून लाकडी चरखे घेऊन अनेक शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. १० ते १५ रुपयांना उसाचा रस विकला जात आहे. उकाड्यामुळे शहाळ्यांनाही मागणी वाढली आहे. दाक्षिणात्य राज्यातून रोज मोठ्या प्रमाणात शहाळ्यांची आवक होत आहे. एरव्ही ३० रुपयांना विकल्या जाणाºया शहाळ््याची किंमत ५० ते ६० रुपये झाली आहे. शहाळ्यांची मागणी ३० टक्क्यांनी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. ऊस व शहाळ्याप्रमाणे मोसंबी फळांच्या रसालाही ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे. कलिंगड, संत्री, मोसंबी, डाळिंब, चिकू, अननस, लिंबू यांची आवक वाढली असून, किमतींमध्येही १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात उपलब्ध असणारे कोल्ड्रिंक्स आरोग्यास घातक ठरत असल्याने यामुळे नागरिकांनी फळांच्या रसाला सर्वाधिक पसंती देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक चौकात तसेच रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात रसवंतीच्या गाड्या पाहायला मिळत असून, या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.
उकाड्यामुळे शीतपेयांना वाढती मागणी, तापमानाचा पारा ३८ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:45 AM