मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली; सफरचंदाला मागणी जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 05:15 AM2018-09-12T05:15:57+5:302018-09-12T05:16:00+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांची आवक वाढली आहे.
नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांची आवक वाढली आहे. मंगळवारी सफरचंदाची सर्वाधिक ३७४ टन आवक झाली असून, डाळिंबासह मोसंबीची आवकही वाढली आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये देशाच्या सर्व भागांतून फळांची आवक होऊ लागली आहे. गणेशोत्सवामध्ये फळांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनीही आवक वाढविली आहे. सद्य:स्थितीमध्ये हिमाचल व काश्मीरच्या काही भागांतून सफरचंदाची आवक होत आहे. मंगळवारी सर्वाधिक ३७४ टन आवक झाली आहे. सोलापूर व राज्याच्या इतर भागांतून डाळिंबाची मोठी आवक होत आहे. देशाच्या विविध भागांतून मोसंबी येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याने बाजारभाव काही प्रमाणात कमी झाले.
गेल्या आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये ४० ते ६० रुपयांना विकले जाणारे डाळिंब ३० ते ५० रुपये किलो दराने विकले जात आहे. ३६ ते ५६ रुपये किलो दराने विकले जाणारे चिकू मंगळवारी २५ ते ४५ रुपये दराने विकले जात होते. पुढील दहा दिवस आवक वाढणार असल्याने बाजारभाव स्थिर राहतील, अशी माहिती फळ व्यापारी महेश मुंढे यांनी दिली.
>फळांची तुलनात्मक आवक व बाजारभाव
वस्तू आवक होलसेल दर
(टन) (किलो)
चिकू ३१ २५ ते ४५
डाळिंब २१३ ३० ते ५०
कलिंगड १७२ ५ ते ९
मोसंबी २५१ ५ ते २५
पपई २४० ३ ते १७
सफरचंद ३७४ २० ते ७५
टरबूज १९ ८ ते १८